आग एकीकडे आणि चटका दुसरीकडे अशा सदरात मोडणाऱ्या एक घटनेची होरपळ कोल्हापुरातील नेत्याला बसली. माजी मंत्री बबनराव घोलप आणि  संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सध्या निवडणुकीचा माहोल असल्याने अशा बातम्यांना अधिकच महत्त्व. साहजिकच त्या बातम्या झपाटय़ाने माध्यमात, समाजमाध्यमात दिसू लागल्या. यात भलतेच घडले. त्या संजय पवारऐवजी कोल्हापुरातील शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचा फोटो वापरला गेला आणि एकच गोंधळ उडाला. संजय पवार शिंदेसेनेत दाखल झाले याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्याकडेही विचारणा होऊ लागली. वस्तुस्थिती लक्षात आली आणि संजय पवार यांना तो मी नव्हेच! असा खुलासा करावा लागला. पाठोपाठच त्यांची यंत्रणा बदला रे तो फोटो असे सांगण्यासाठी सतर्क झाली.

संजय राऊत यांचा नेम चुकला ?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सलग दोन रात्री सांगलीत तळ ठोकला. सांगली लोकसभेसाठीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी करणे, मतांची जुळणी करणे, मूठभर असलेल्या स्वपक्षीयांची मोट बांधणे आणि नवीन मित्र गोळा करून प्रचाराच्या कामाला लावणे हा मूळ उद्देश या दौऱ्यामागे होता. मात्र, नित्याच्या सवयीप्रमाणे ते भाजपवर तोंडसुख घेतील असे वाटत असताना त्यांच्या तोफेचे तोंड मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसकडेच अधिक दिसले. नवे मित्र जोडण्याच्या नादात मित्र पक्षावरच बॉम्बगोळय़ांची बरसात सतत तीन दिवस करत राहिले. यामुळे मित्राची सांधेजोड तर दूरच राहिली, आघाडीतच बेबनाव निर्माण करत त्यांनी उरली सुरली सहानुभूतीही गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत जरी उमेदवार अधिकृत झाला तर प्रचाराला माणसे कुठली आणायची याची चिंता कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. जरा सबुरीने घेतले असते तर भाजपचा गेम करता आला असता, पण राऊतांचा नेम चुकला, असेच आघाडीचे नेते बोलू लागले आहेत.

हेही वाचा >>>भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सपा आणि बसपाच्या उमेदवारांना टक्कर देणार; नगीना मतदारसंघ कोण जिंकणार?

तोफ धडाडली

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि सत्ताधारी भाजपचे राम सातपुते यांची तुल्यबळ लढत होत असताना स्थानिक विकास आणि उपरा या मुद्दय़ावर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक विकासाच्या मुद्दय़ावरील आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपकडून मोदी सरकारची विकासकामांची जंत्री पुढे केली जाते. यात सोलापूरजवळ तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी रे नगर योजनेतून उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचाही दावा भाजपचे राम सातपुते यांनी केला आहे. परंतु हा दावा खोडून काढताना या रे नगर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सातपुते यांना खास शैलीने चिमटे घेतले आहेत. रे नगर योजनेसाठी आम्ही डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळापासून सतत १४ वर्षे संघर्ष केला. शेवटी यशस्वी पाठपुराव्यामुळे रे नगर योजना साकार होण्यास मदत झाली. मोदी सरकारने मंजुरी दिली म्हणजे सर्व काही भाजपने केले, असे होत नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसला पािठबा देताना त्यांची तोफ धडाडण्यापूर्वीच गाजू लागली आहे.

मतदार राजा..

राजकीय नेत्यांना वाकवण्यासाठी जनतेच्या दृष्टीने निवडणूक ही नामी संधी असते. या काळात ही मंडळी अगदी काकुळतीला येऊन मतदार राजाची विनवणी करताना दिसतात. त्यांची ही अगतिकता ओळखून खेड तालुक्यातील तळे-म्हसोबावाडी येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे सर्व पक्षीय उमेदवारांना गावात ‘नो एन्ट्री’चे फलक लावले आहेत. झोळीवाडी फाटय़ापासून म्हसोबावाडीकडे जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचा फलक लावण्यात आला होता. त्यापैकी मारुती मंदिर फाटय़ापासून म्हसोबावाडीतील रस्ता दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर केवळ गटर कटिंग करून ५ मीटर लांबीची रिटेनिंग भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे ६० लाख रुपयांऐवजी केवळ १५ लाख रुपये खर्च करून काम भागवले असून आवश्यकता नसलेल्या ठिकाणी ६० लाख रुपये खर्च झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने गावात मतांसाठी येऊ नये, असे फलक ग्रामस्थांनी लावले असून मतदानावर बहिष्काराच्या निर्णयावरही ते ठाम आहेत.

उमेदवारीसाठीही ड्रोन ?

महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून बेबनाव निर्माण झाला आहे. भाजपच्या वरिष्ठांनी छगन भुजबळ यांचे नाव लावून धरले असताना शिंदे गट जागा देण्यास तयार नाही. या जागेसाठी आग्रही राहिलेले भाजपचे स्थानिक पदाधिकारी भुजबळांच्या नावाबद्दल समाधानी नाहीत. राजकीय पातळीवर कलह निर्माण झाला असताना सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या निवास आणि कार्यालय परिसरावर ड्रोनने घिरटय़ा घातल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जवळपास १० ते १५ मिनिटे ड्रोन घिरटय़ा घालून अंतर्धान पावले. ड्रोनच्या संशयास्पद भ्रमंतीमुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. ड्रोन फिरत होते, तेव्हा भुजबळ हे मुंबईत होते. राजकीय पटलावर वातावरण तापलेले असताना उमेदवारांच्या हालचालींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते की काय, अशी कुजबुज पदाधिकाऱ्यांमध्ये होत आहे.

(संकलन : दिगंबर शिंदे, सतीश कामत, एजाज हुसेन मुजावर, अनिकेत साठे, दयानंद लिपारे.)