दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्वात जुन्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी महिन्याभराने मतदान होणार असले तरी आतापासूनच सत्तारूढ आणि विरोधी गटाने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत.  कारखान्यावरील सत्ता टिकवण्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे. तर कारखाना ताब्यात घेण्यासाठी विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जय्यत तयारी केली असल्याने प्रचाराची हवा चांगलीच तापली आहे.

 राजाराम कारखान्याची निवडणूक गेली दोन- तीन वर्षापासून चर्चेत आहे. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा असो की सभासद वैधतेचा मुद्दा प्रत्येक बाबीतून संघर्ष पुढे येत गेला. कारखान्याच्या कारभारा विरोधात विरोधी गटाने वार्षिक सभेत सातत्याने प्रश्न उपस्थित केले. कारखान्याची प्रगती पाहवत नसल्याने विरोधकांचा पोटशूळ सुरू आहे असा पलटवार सत्तारूढ गटाकडून केला गेला. न्यायालय, साखर सहसंचालक कार्यालय येथे सभासद वैधतेचा मुद्दा गाजत राहिला.

हेही वाचा >>> अनंतराव देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससमोरील आव्हानात भर

 सभासद बांधणीतून पायाभरणी

 सांगली जिल्ह्यातील १३४६ सभासद वैध असण्याचा मुद्दा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय पर्यंत दोन्ही गटाकडून ताणला गेला. पुढे १८९९ सभासद वैध असण्यावरून दावे – प्रतिदावे सुरू झाले. १८९९ सभासदांवर सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवला होता. हे सभासद पात्र असल्याचा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीला प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी दिला. त्यावर सत्तारूढ महाडिक गटाची बाजू या निर्णयाने भक्कम झाली असा दावा करण्यात आला. वैध सभासदांचा खोटा आकडा महाडिक गटाकडून सांगून सभासदांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. सुमारे ७५० सभासद वैध होण्याची शक्यता आहे. महाडिक गटाचे ७५७ सभासद बोगस मतदान करण्याचे नियोजन उधळून लावू, असा प्रतिदावा विरोधी सतेज पाटील गटाने केला आला. सभासद पात्र ठरवण्याचे प्रकरण ताणून धरताना दोन्ही गटाने सभासद बांधणीची पायाभरणी केली आहे.

गोकुळ आणि राजाराम

  अशा वाद आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजाराम साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. आठ वर्षापूर्वी चुरशीच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी बाजी मारली होती. थोडक्या मताने पराभव झाल्यावर मागील कसर भरून काढण्याच्या निर्धाराने सतेज पाटील यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुढील निवडणुकीत विजय मिळवला होता. तशी पुनरावृत्ती राजाराम कारखान्यांमध्ये करता येईल अशी आमदार सतेज पाटील यांची अटकळ आहे. राजाराम कारखाना हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सत्ताकेंद्र महाडिक कुटुंबाकडे उरले असल्याने काहीही करून ते  हातून जाऊ द्यायचे नाही असा ठाम निर्धार करून महाडिक परिवार प्रचारामध्ये सक्रिय झाला आहे. यावेळी राजारामच्या प्रचाराची सूत्रे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे आली आहेत. त्यांना खासदार धनंजय महाडिक यांची सोबत मिळत आहे. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद या निवडणुकीत उमटणार असल्याने त्याचे समीकरण महत्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा >>> भाजपाच्या आयटी सेलचा माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा स्वतःच्या एलडीपी पक्षासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

 आरोप – प्रत्यारोपाचा धुरळा

 कारखान्याची निवडणूक रंगात येऊ लागली आहे तशी प्रचाराच्या बैठका, वैयक्तिक गाठीभेटी यांना गती आली आहे. त्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडत आहे. सतेज पाटील हे राजाराम कारखाना म्हणजे महाडिक यांची वैयक्तिक मालमत्ता असल्याचा मुद्दा प्रचारात अधोरेखित करीत आहेत. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावाने होईल, असा मुद्दा ते प्रकर्षाने मांडत आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांची पाटील यांना यावेळी सोबत लाभली आहे. महाडिक यांच्या ताब्यात कारखाना गेला तर ते कारखाना संपवतील, अशी टीका माने यांनी महाडिक पिता पुत्रांवर करीत आहेत. विरोधकांचे आरोप महाडिक गट खोडून काढत आहे. जमीन लाटण्याचा इतिहास असणाऱ्यांनी कारखान्याच्या सातबारा बाबत चिंता करू नये, अशा शब्दात अमल महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

२७ वर्ष कारखान्यात सहकार जपण्याचे काम केले आहे. या उलट डी. वाय. पाटील कारखान्याचे सभासद रातोरात कमी करणाऱ्यांना आता सभासदांची काळजी वाटू लागली आहे. हे पुतना मावशीचे प्रेम आहे, असा टोला ते सतेज पाटील यांना उद्देशून लगावत आहेत. सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यातील महाडिक यांच्या मक्तेदारीवर प्रश्न उपस्थित केले की महाडिक यांच्याकडून पाटील यांच्या डी. वाय. पाटील कारखान्यातील एकाधिकारशाहीवर प्रश्न लावले जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा बराचसा भाग हा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच जात आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवोदित अमल महाडिक यांच्याकडून तत्कालीन गृह राज्य मंत्री सतेज पाटील पराभूत झाले होते. आता राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून निमित्ताने दोघांमध्ये ८ वर्षानंतर पुन्हा एकदा सामना रंगला आहे. या आखाड्यात कोणाची सरशी होवून साखरेचा गोडवा चाखणार याचे कुतूहल कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक, साखर कारखानदारांमध्ये दाटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadik patil conflict in kolhapur now in rajram sahakari factory elections print politics news ysh
First published on: 21-03-2023 at 09:57 IST