Muslim Candidates Fall Across Main Parties : देशाची राज्यघटना, मुस्लीम, संपत्तीचे फेरवाटप, आर्थिक विषमता, निवडणूक रोखे, राम मंदिर हे काही या लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. खासकरून राम मंदिर आणि मुस्लीम या विषयांभोवतीही बरेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देशामध्ये मुस्लीम समाजाला लोकसभा निवडणुकीमध्ये किती प्रतिनिधित्व मिळाले आहे, याचा आढावा घेतल्यास फार काही चांगले चित्र उभे राहताना दिसत नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने संपूर्ण देशभरात फक्त एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. बिहारमध्ये भाजपाचा सहकारी पक्ष जेडीयूनेही एकाच मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. इंडिया आघाडीमधील महत्त्वाच्या आणि मोठ्या पक्षांनी दिलेल्या उमेदवारीमध्ये मुस्लिमांची संख्या घटल्याचे चित्र आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माकप अशा सर्व राष्ट्रीय पक्षांनी मिळून फक्त ७८ मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षांनी दिलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या ११५ होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ११५ पैकी २६ मुस्लीम उमेदवारांचा विजय झाला होता. त्यामध्ये काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमधील प्रत्येकी चार; तर बसपा व सपामधील तीन उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माकपमधून प्रत्येक एक मुस्लीम उमेदवार विजयी झाला होता. इतर उमेदवारांमध्ये आसाममधील AIUDF, लोक जनशक्ती पासवान, IUML आणि जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या उमेदवारांचा समावेश होता.

हेही वाचा : दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!

बहुजन समाज पार्टी

२०२४ च्या निवडणुकीमध्ये बसपा हा मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी देणारा पक्ष आहे. या पक्षाकडून ३५ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक मुस्लीम उमेदवार उत्तर प्रदेशमध्ये (१७) उभे करण्यात आले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (४), बिहार (३), दिल्ली (३), उत्तराखंड (२) आणि राजस्थान, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, गुजरातमधून प्रत्येकी एक उमेदवार उभा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये बसपाने ३९ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांना विजय मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाने ६१ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यापैकी एक जणही विजय मिळवू शकला नव्हता. २०१४ मध्ये त्यांनी संपूर्ण देशभरात ५०३ उमेदवार उभे केले होते. सध्या बसपा ४२४ जागांवर निवडणूक लढवीत आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बसपा आणि सपाने युती केली होती. दोन्ही पक्षांच्या मागे ‘मुस्लीम व्होट बँक’ असूनही २०१९ मध्ये बसपाने उत्तर प्रदेशमध्ये सहा मुस्लीम उमेदवार उभे केले होते. सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ मुस्लीम उमेदवार बसपाकडून रिंगणात उतरले आहेत. यावेळी बसपाने भाजपाला मदत करण्यासाठीच मुद्दाम अधिक मुस्लिमांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशमधील निवडणूक एकत्र लढत आहेत.

राष्ट्रीय काँग्रेस पार्टी

बसपानंतर काँग्रेस मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी देणारा पक्ष ठरलाय. त्यांनी संपूर्ण देशभरात १९ मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सहा, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, केरळ, ओडिसा, तेलंगणा व लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी एक मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने ‘मुस्लीम तुष्टीकरणा’च्या मुद्द्यावर काँग्रेसवर भरपूर टीका केली होती. त्यावेळी काँग्रेसने ३४ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये १० आणि उत्तर प्रदेशमध्ये आठ मुस्लीम उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी चार उमेदवारांनी विजय मिळविला होता. २०१९ च्या तुलनेत यावेळी काँग्रेसने ४२१ वरून ३२८ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकूण ४६४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ३१ जागांवर मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यातील तीन मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते.

तृणमूल काँग्रेस

मुस्लिमांना उमेदवारी देण्यामध्ये तृणमूल काँग्रेस हा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी सहा मुस्लीम उमेदवार उभे केले असून, त्यापैकी पाच उमेदवारांना पश्चिम बंगालमध्येच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आसाममध्ये एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल, ओडिसा, त्रिपुरा, आसाम व बिहार अशा पाच राज्यांमध्ये १३ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सर्वाधिक उमेदवार अर्थातच पश्चिम बंगालमध्ये उभे होते. त्यापैकी चार मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळविला. २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसने २४ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी तीन जणांचा विजय झाला होता. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या घटत चालली आहे. २०१४ मध्ये १३१, २०१९ मध्ये ६२, तर आता २०२४ मध्ये ते ४८ मतदारसंघांत निवडणूक लढवीत आहेत.

समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांचा चांगला पाठिंबा मिळताना दिसतो. मात्र, तरीही पक्षाने यावेळी फक्त चार मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी २०१९ मध्ये १०, तर २०१४ मध्ये ३९ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. २०१४ मध्ये समाजवादी पार्टीने एकूण १९७ जागांवर निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये ४९; तर २०२४ च्या या निवडणुकीत ते ७१ जागांवर निवडणूक लढवीत आहेत. यावेळी सपाने उभे केलेल्या चार मुस्लीम उमेदवारांपैकी तीन मुस्लीम उमेदवार उत्तर प्रदेशमधून, तर एक उमेदवार आंध्र प्रदेशमधून निवडणूक लढवतो आहे. आंध्र प्रदेशमध्ये सपाने यादव समाजातीलही काही व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये समाजवादी पार्टीने महाराष्ट्रातही तीन मुस्लीम व्यक्तींना उमेदवारी दिली होती. मात्र, यावेळी समाजवादी पार्टी महाराष्ट्रात निवडणूक लढवत नाही.

राष्ट्रीय जनता दल

बिहारमध्ये मुस्लिमांचे चांगले समर्थन मिळविणारा पक्ष म्हणजे राजद होय. परंतु, राजदने बिहारमधून फक्त दोन मुस्लीम व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये त्यांनी पाच मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकालाही विजय मिळविता आला नव्हता. २०१४ मध्ये त्यांनी उभ्या केलेल्या सहा मुस्लीम उमेदवारांपैकी एका उमेदवाराने विजय प्राप्त केला होता. २०१९ मध्ये राजदने एकूण १९ जागांवर निवडणूक लढवली होती; तर आता ते २३ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवीत आहेत.

हेही वाचा : पलटूराम विरुद्ध एकनिष्ठ! राजकीय हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघात चुरशीची लढत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २०१९ मध्ये तीन मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी एका उमेदवाराला विजय प्राप्त झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी प्रत्येकी एका मुस्लीम उमेदवाराला उभे केले आहे. विशेष म्हणजे ही उमेदवारी त्यांनी महाराष्ट्रात नाही, तर लक्षद्वीपमध्ये दिली आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन मुस्लीम उमेदवारांपैकी दोघांनी निवडणूक जिंकली होती.

भारतीय जनता पार्टी

२०१९ मध्ये भाजपाने संपूर्ण देशभरात ४३६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन उमेदवार मुस्लीम होते; मात्र एकही जण विजय मिळवू शकला नव्हता. २०१४ मध्ये भाजपाने एकूण ४२८ मतदारसंघांत निवडणूक लढवली; त्यापैकी सात जागांवर मुस्लीम उमेदवार दिले. मात्र, एकालाही विजय मिळाला नव्हता. यावेळी भाजपा ४४० जागांवर निवडणूक लढवीत असून त्यांनी फक्त एका मुस्लिमाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

माकप-भाकप

२०१९ मध्ये माकप आणि भाकप यांनी एकत्रितपणे १३ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये सात, तर लक्षद्वीप व केरळमध्ये प्रत्येकी एक उमेदवार उभा केला होता. त्यापैकी फक्त एका उमेदवाराला विजय मिळाला. २०१४ मध्ये त्यांनी १७ मुस्लीम उमेदवार दिले; त्यापैकी दोघांना विजय मिळाला. २०२४ मध्ये फक्त माकपने मुस्लीम उमेदवार दिले आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पाच, केरळमध्ये चार, तर तेलंगणामध्ये एक, असे एकूण १० उमेदवार दिले आहेत.

इतर पक्ष

देशातील इतर लहान पक्षांमधील एआयएमआयएम, आययूएमएल व एआययूडीएफ हे पक्ष मुस्लिम हितसंबंधाचे राजकारण करण्यासाठीच ओळखले जातात. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये अनेक मुस्लीम उमेदवार दिले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim candidates in loksabha election 2024 across main parties vsh
First published on: 19-05-2024 at 13:07 IST