अलीकडील तुमची विधाने पाहता उमेदवारी लादली गेली असे वाटते?
नाही. पण एक मात्र खरे आहे की, मला दिल्लीचे आकर्षण नव्हते. अजून काही काळ आमदार म्हणून काम करायचे होते. परंतु आता जबाबदारी दिली आहेच तर ती पार पाडूच. आतापर्यंत आपण ज्या चार निवडणुका लढलो, त्यात भरघोस मतांनी निवडून आलो आहोत. १ मे रोजी उमेदवारी जाहीर झाली. २० दिवसांत सहा विधानसभा मतदारसंघ आणि ४१ नगरसेवकांचा परिसर मला पिंजून काढायचा आहे. त्या दिशेने लोकांना भेटत आहे. लोकांचा स्वत:हून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मनसेने तुमच्या उमेदवारीला विरोध केला… भाजपातही कुजबुज होती ?
भाजप, मनसे आता सर्वजण माझ्या प्रचारात हिरिरीने उतरले आहेत. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी राजकारणात आहे. पालिका, विधानसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. माझी आतापर्यंतची ओळख ही कामामुळे आहे. रवींद्र वायकर हा काम करणारा ब्रँड आहे. लोकांनाही काम करणारा माणूस हवा आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी काम करतो. कुठलाही अनुभव नसलेली नवखी व्यक्ती लोकसभेत जाऊन दिग्गजांपुढे टिकू शकत नाही. लोकसभेत बोलावे लागते. आपण गेले अनेक वर्षे पालिकेत व विधीमंडळात प्रत्येक विषयावर बोलतो व पाठपुरावा करुन कामे करुन घेतो.
विजयाचे गणित कसे मांडता?
मला किती मते मिळणार वा मताधिक्य किती असेल आदी बाबींना मी महत्त्व देत नाही. विजय हेच माझे गणित आहे. आतापर्यंत आमच्या खासदारांनी काय केले यापेक्षा मी ‘दूरदृष्टी’ला (व्हिजन) महत्त्व देतो. खासदाराला ‘व्हिजन’ असावे, असे माझे मत आहे. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरही मी प्राधान्य यादी निश्चित केली आहे. नगरसेवक आणि आमदार म्हणून मी अगणित कामे केली आहेत. एक अनुभवसंपन्न लोकप्रतिनिधी म्हणून मला पसंती मिळेल, याची मला खात्री आहे. आमदार असतानाही खासदारांच्या पातळीवरील कामे करुन दाखविली आहेत. त्यामुळे खासदार झाल्यानंतर मी अधिक प्रभावीपणे कामे करु शकेन.
विद्यमान खासदार तुमच्याच पक्षाचे आहेत…
आजी-माजी सहकाऱ्यांवर मी कधीही आरोप केले नाहीत. दोषारोप करण्यापेक्षा काम करण्याला माझे प्राधान्य आहे. आतापर्यंत तीच पद्धत अवलंबिली. त्याचा परिणाम म्हणजे लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले. आता खासदाराने काय काम करायचे असते हे आपण दाखवून देऊ. इतक्या वर्षांत मुंबईचा योजनाबद्ध रीतीने विकास झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेत कुठले विषय मांडायचे याची खासदाराला जाण हवी. मला त्याची निश्चितच जाणीव आहे.
आणखी वाचा-मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण
प्रचारातील मुख्य मुद्दे कोणते?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा, याला माझे प्राधान्य राहील. सात राज्यांना त्यांच्या भाषेचा दर्जा मिळतो, मग महाराष्ट्राला का नाही? यासाठी लोकसभेत पाठपुरावा करुन तो मिळवूच. विकास नियंत्रण नियमावली २०३४ मध्ये विविध ठिकाणी दाखविण्यात आलेल्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे आहेत आणि ती हटवून पुनर्वसन करण्याबाबत निश्चित धोरण असावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ व आधुनिकीकरण, सतत भेडसावणारी वाहतूक कोंडी, कोळीवाडे व गावठाणवासीयांच्या पुनर्विकासासाठी धोरणाचा अभाव, मुंबईत अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाची उभारणी, जोगेश्वरीतील होरिटेज गुंफा आणि गिल्बर्ट हिलचे संवर्धन, पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, खारफुटींचे संरक्षण, जुहू समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून सुशोभिकरण, गावठाण व कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र नियमावली, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंगची भेडसावणारी समस्या सोडविण्यासाठी अधिकाधिक वाहनतळांची उभारणी, झोपडीवासीयांचे तसेच म्हाडावासीयांचे रखडलेले पुनर्वसन, विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंचीवर घालण्यात आले निर्बंध व त्यामुळे रखडलेला पुनर्विकास आदी कितीतरी विषय माझ्या प्राधान्यक्रम यादीमध्ये आहेत.