नगरः गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत एक नवीन पॅटर्न उदयाला येऊ पहात आहे. यापूर्वी जिल्ह्यात सहकाराच्या निवडणुका, बहुतांशीपणे पक्ष कोणताही असो, भाजप नेते, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध काँग्रेस नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या दोन गटांतच प्रामुख्याने लढल्या जातात. विखे विरुद्ध इतर सारे अशा निवडणूक पद्धतीत थोरात यांच्या मदतीला हमखासपणे राष्ट्रवादीच असे. परंतु ‘गणेश’च्या निवडणुकीत विखेंना शह देण्यासाठी थोरात यांनी प्रथमच राष्ट्रवादीला लांब ठेवले आणि विखेंमुळे दुखावलेले भाजपमधीलच कोल्हे यांना बरोबर घेतले. त्याचा योग्य तो परिणाम थोरात यांना साधता आला. विखे यांच्या घरच्या मैदानावरच त्यांना पराभव सहन करावा लागला.
मंत्री विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ते व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रतिष्ठेची केली होती. थोरात व भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांचे पुत्र, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटाने विखे पिता-पुत्रांना जोरदार धक्का देत या निवडणुकीत १९ पैकी १८ जागा जिंकून विखे यांच्यावर मात केली. विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोल्हे यांनी विखे यांना साथ दिली होती. त्यावेळी तेथे बँकेचे अध्यक्षपद भाजपला मिळवायचे होते आणि त्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते. परंतु ‘गणेश’च्या निवडणुकीत कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पराभवाची परतफेड केली.
हेही वाचा – विरोधकांच्या महाआघाडीची उद्या बैठक; अजेंड्यावर जातगणना आणि जागावाटप!
नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये एक अलिखित करार आहे, सहसा कोणी कोणाच्या कार्यक्षेत्रात, कारखान्याच्या निवडणुकीत ढवळाढवळ करत नाहीत, त्यामुळेच बहुतांशी साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होतात. परंतु गणेश कारखान्याचे कार्यक्षेत्र थोरात यांच्या संगमनेर, काळे-कोल्हे यांच्या कोपरगाव व विखे यांच्या शिर्डी अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागले गेलेले आहे. तिन्ही गटांना मानणारे मतदार तेथे आहेत. विखे व थोरात या दोघांनी परस्परांच्या कार्यक्षेत्रात जाऊन एकमेकांना आव्हान दिले. ‘गणेश’च्या निवडणुकीत मंत्री विखे यांच्या विरोधात कोल्हे यांना भाजपमधीलच काही नेतेमंडळींची साथ मिळाल्याची कुजबूज होत आहे.
गणेश कारखान्यावर नऊ वर्षानंतर पुन्हा कोल्हे गटाची सत्ता आली. दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांची ‘गणेश’वर सत्ता असताना १९८८ मध्ये हा कारखाना बंद पडला. त्याचवेळी सभासदांनी सत्तांतर केले व दिवंगत माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या गटाची सत्ता आली होती. नंतरच्या काळात गणेश अडचणीत येऊ लागला. कोल्हे यांचे व ‘गणेश’च्या संचालक मंडळातील अंतर वाढू लागले. कोल्हे यांनी कारखान्याकडे काहीसा कानाडोळा केला. कारखाना अडचणीत आला. सहाजिकच ‘गणेश’च्या तत्कालीन संचालकांना मंत्री विखे यांचा आधार घ्यावा लागला. विखे यांनी जिल्हा बँकेतून गणेशला आर्थिक मदत मिळून दिली. गणेश काही काळ चांगला चालला. परंतु पुन्हा बंदची अवस्था सुरू झाली.
सन २०१२-१३ मध्ये कारखाना बंद होण्याच्या मार्गावर असताना विखे पितापुत्राच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने ‘गणेश’ चालवण्यास घेतला. आठ वर्षांचा करार झाला. विखे यांनी कारखाना चालवला. तो कायम सुरू राहावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. कारण ‘गणेश’ बंद राहिल्यास त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत आपल्याला बसू शकतो याची जाणीव मंत्री विखे यांना आहे. परंतु सभासदांनी ‘गणेश’ची सत्ता त्यांच्याकडून काढून पुन्हा कोल्हे गटाच्या ताब्यात दिली. गणेश सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यातून थोरात-विखे गट कसा मार्ग काढून कारखाना चालवतात, हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
हेही वाचा – अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविणार का?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या निवडणुकीत मंत्री विखे यांच्यामुळे पराभव झाल्याची सल कोल्हे कुटुंबीयांना होती. तशी तक्रार त्यांनी भाजप नेते फडणवीस यांच्याकडे केली होती. विखे यांना भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून पाठबळ मिळते आहे, त्यांचे पक्षातील महत्त्वही वाढते आहे. तरीही कोल्हे कुटुबीयांनी विखे यांच्या विरोधात लढण्याचे धाडस दाखवले. ही मोठी लक्षणीय घटना मानली जाते. तसा ‘गणेश’च्या निवडणुकीत विखे-कोल्हे गटातील संघर्ष गेल्या ३० ते ३५ वर्षांपासूनचा आहे. तो सर्वश्रुत आहे. परंतु त्यावेळी दोघे एकाच पक्षात असूनही दोन्ही गटात थेट लढती होत. त्यामध्ये तिसरा कोणी नसे. परंतु आता थोरात यांनी हमखास साथ मिळणाऱ्या राष्ट्रवादीला पर्यायाने, आमदार आशुतोष काळे यांना बरोबर न घेता विखे यांच्याकडूनच दुखावले गेलेले कोल्हे गटाला बरोबर घेतले.
या निमित्ताने थोरात-विखे पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले होते. दोघे आता दोन वेगवेगळ्या पक्षांत आहेत. परंतु त्यांच्यातील संघर्ष कायम आहे. ‘संगमनेर’मधील मंत्री विखे यांचा वाढता हस्तक्षेप थोरात यांना मान्य नाही. थोरात यांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच, त्यांच्याविरोधात हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा निघाला, दगडफेकीची घटना घडली. ‘गणेश’च्या माध्यमातून थोरात यांनी विखे यांना शह दिला. त्यामुळे आगामी काळात थोरात-विखे यांच्यातील संघर्ष अधिक धगधगता राहणार आहे. गणेशच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील थोरात-कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या रुपाने पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. त्याचे परिणाम आगामी शिर्डी विधानसभा निवडणुकीत दिसणार का? याची उत्सुकता आता जिल्ह्यात व्यक्त केली जाते.