“भाजपाच्या आश्वासनावर विसंबून राहू नका, असा सल्ला १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरसिंह राव यांना दिला होता. पण, त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा सल्ला मनावर घेतला नाही”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांनी लिहिलेल्या “हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या चर्चासत्रात शरद पवार यांनी बाबरी पाडण्याच्या प्रसंगाचा घटनाक्रम सांगितला. नीरजा चौधरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात सहा माजी पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा आणि त्याचे भारतावर झालेले तत्कालीन परिणाम यांचा आढावा घेण्यात आला आहे. या चर्चासत्राला काँग्रेस नेते शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे दिनेश त्रिवेदीदेखील उपस्थित होते. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे होते; तर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या चर्चासत्रात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

शरद पवार, नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम करत होते. नरसिंह राव यांना इशारा दिल्यानंतरही त्यांनी बाबरी मशीद पाडण्याला एका अर्थी परवानगी दिली का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मंत्र्यांच्या एका गटाने पंतप्रधान नरसिंह राव यांना सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यास सांगितली होती. या मंत्रिगटात माझाही समावेश होता. विजया राजे सिंधिया यांनी सांगितले की, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही. आम्ही सर्वकाही काळजी घेऊ, त्यामुळे पंतप्रधानांनी कठोर पाऊल उचलू नये.”

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

हे वाचा >> राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द; सत्तेसाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या- राजीव गांधींना अरुण नेहरूंनी दिलेला सल्ला

“विजया राजे यांचा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. व्यक्तिशः मी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, गृह सचिव माधव गोडबोले असे तिघेही एका मताचे होतो. भाजपाच्या नेत्यांवर बिलकूल विसंबून राहू नये, काहीही होऊ शकते, असा इशारा आम्ही दिला होता. पण, पंतप्रधान नरसिंह राव यांनी भाजपाच्या नेत्यांचे ऐकले आणि त्यानंतर काय घडले हे सर्व देशाने पाहिले”, असेही शरद पवार पुढे म्हणाले. तुम्हाला आतापर्यंत कोणता पंतप्रधान सर्वात प्रभावी वाटला, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी नरसिंह राव यांचे नाव घेतले. “देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विशिष्ट वर्गाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी योग्य निर्णय घेतले”, असे कारण पवार यांनी दिले.

लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांना विचारण्यात आले की, बाबरी पाडण्यामध्ये नरसिंह रावदेखील भाजपाला मिळालेले होते का? यावर बोलताना चौधरी म्हणाल्या की, याचा कोणताही पुरावा नाही. पण, बाबरी पाडल्यामुळे एक किचकट प्रश्न संपेल, अशी त्यांची भावना होती. तसेच भाजपाचा एक मुद्दा कायमचा संपून जाईल, असे नरसिंह राव यांचे मत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “यूपीएच्या दोन सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते सरकार पडले. २जी, कोळसा घोटाळा, राष्ट्रकूल स्पर्धा घोटाळा… अशा अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करता येईल. त्यांना (मनमोहन सिंग) ते थांबवता आले नाही. अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये तर काहीही नव्हते, हे नंतर सर्वांना समजले. पण, हे सरकार अत्यंत भ्रष्ट सरकार आहे, असा समज पसरवला गेला. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे त्यात भरच पडली.”

भाजपा नेते त्रिवेदी तृणमूल काँग्रेसमध्ये असताना यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काही काळासाठी रेल्वे मंत्री होते. त्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला होता. ते म्हणाले की, दुसऱ्या टर्ममध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचा रस कमी झाला होता. “मला वाटते, दुसऱ्या टर्मच्या अखेरीस डॉ. मनमोहन सिंग यांचा रस उडाला होता. कुणीही उठतो व सरकारने काढलेला अध्यादेश फाडून टाकतो आणि त्यात ते काहीच करू शकत नव्हते. त्यांचे आता नियंत्रण उरले नाही, हे त्यांना कळून चुकले होते.” त्रिवेदी यांनी अध्यादेश फाडण्यावरून राहुल गांधी यांचे नाव न घेता टोला लगावला.

आणखी वाचा >> ‘भाजपा-संघाचा नेहरूंना विरोध असला तरी पंतप्रधान मोदी दुसरे नेहरू बनू पाहत आहेत’, ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकात दावा

त्रिवेदी पुढे म्हणाले की, मी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मनमोहन सिंग यांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी त्याला विरोध केला होता, ज्यामुळे मला राजीनाम द्यावा लागला. मी माझा राजीनामा घेऊन मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो असता, त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. ते म्हणाले, तुम्ही जावे असे मला वाटत नाही. मी उत्तर देताना म्हटले की, तुम्ही कर्णधार आहात. तुम्ही जर राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला, तर मी मंत्रिपदावर कायम असेन. “पण त्यानंतर सरकार पडेल”, असे ते म्हणाल्याची आठवण त्रिवेदी यांनी सांगितली.

शशी थरूर म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग हे कमकुवत पंतप्रधान आहेत असे म्हटले गेले, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे.” “आघाडीचे सरकार असल्यामुळे त्यांच्यापुढे काही मर्यादा होत्या. युती – आघाडी अशी गोष्ट आहे, ज्याचा मोदींनी आजवर सामना केलेला नाही. २०२४ नंतर जर परिस्थिती बदलली, तर तुम्ही मोदींबद्दल वेगळे म्हणू शकता.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या पुस्तकात नमूद केलेला नाही, असे नीरजा चौधरी यांनी सांगितले. मोदींबद्दल बोलताना भाजपाचे राज्यसभा खासदार त्रिवेदी म्हणाले, “पंतप्रधान देशासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. आतापर्यंत त्यांच्यासह काम करण्याची मला संधी मिळालेली नाही. भविष्यात मिळेल की नाही कल्पना नाही. मित्र म्हणून मी मोदींना चांगला ओळखतो. ते दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करत असतात. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांप्रमाणे मोदीही देशाचाच सतत विचार करत असतात. पण, सर्वाधिक आवडणाऱ्या पंतप्रधानांबद्दल विचाराल, तर मला अटल बिहारी वाजपेयी अधिक भावले. कवी मनाचा माणूस, ज्याला खाण्याची आवड होती आणि कोणत्याही गोष्टीबाबत आडपडदा ठेवायचा नाही, अशी त्यांची कार्यशैली होती. ते जे होते, ते तेच असू शकतात.”