दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशात दोन मतप्रवाह बघायला मिळत आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार अरविंद केजरीवाल हे निर्दोष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात बोलत असल्यानेच त्यांना अटक करण्यात आली आहे. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार अरविंद केजरीवाल हे स्वत: भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून राजकारण आले. मात्र, ते आत इतर राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचारी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या जन्मगावी, म्हणजे हरियाणाच्या भिवनी जिल्ह्यातील सिवनी या गावातील, गावकरांच्या नेमक्या काय भावना आहेत? याशिवाय सिवनी येथे राहणारे अरविंद केजरीवाल यांचे काका गिरीधरलाल बन्सल यांना ईडीच्या कारवाईबाबत काय वाटतं? यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ने घेतलेला हा आढवा.

हेही वाचा – बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत

केजरीवाल यांचे काका गिरीधरलाल बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. मात्र, आता त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबरच मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. खरं तर अरविंद केजरीवाल हे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरोधात बोलत आहेत, त्यामुळेच त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

गिरीधरलाल बन्सल हे अरविंद केजरीवाल यांच्या वडिलांच्या तीन भावंडापैकी एक आहेत. ते सध्या दिल्लीजवळच असलेल्या गुडगाव येथे राहतात, ते दर महिन्याला त्यांच्या सिवनी या गावी जातात.

गिरीधरलाल बन्सल यांनी सांगितले, की अरविंद केजरीवाल यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. कमी वयातच त्यांनी शिक्षणसाठी घर सोडले. त्यानंतर ते सातत्याने गावात येत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं गावात येणं कमी झाले.

दरम्यान, सिवनी गावातील गावकऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात स्पष्टपणे नाराजी दिसून येत आहे. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी गावात येणं जवळपास बंद केलं आहे. तसेच त्यांच्यावरील ईडी कारवाईवरून अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

सिवनी गावातील व्यवसायिक जगदीश प्रसाद केडिया यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातील जनतेला केजरीवाल यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. ते म्हणाले, ”आम्हाला अभिमान होता, की आमच्या गावातील एक व्यक्ती देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढतो आहे. या आंदोलनानंतर ते मुख्यमंत्रीही झाले. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला मी स्वत: उपस्थित होतो. तीन वर्षांपूर्वी आम्ही मंदिराच्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे आर्थिक मदत मागितली होती. मात्र, ते आले आणि मंदिरात दर्शन करून गेले. त्यांनी आर्थिक मदतही दिली नाही. त्यामुळे गावकरी निराश झाले होते.”

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना केडिया म्हणाले, ”अरविंद केजरीवाल हे निर्दोष आहेत की नाही, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठवले. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाही, हे योग्य नाही.”

हेही वाचा – अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’ कुणाला तारक, कुणाला मारक?

केडिया यांच्या व्यतिरिक्त सिवनी गावातील अन्य एक व्यावसायिक सोमनाथ शर्मा म्हणाले, ”अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत चांगले सरकार चालवले. दिल्लीतील जनतेचे जीवन त्यांनी सोपी केले. दिल्लीत पुन्हा त्यांचे सरकार येऊ शकते. मात्र, मला दु:ख या गोष्टीचं आहे, की आम आदमी पक्ष हा हरियाणात म्हणावा तसा वाढू शकला नाही.”

सिवनी गावात मजदूरी करणारे अनूप शर्मा म्हणाले, ”ज्यावेळी आम आदमी पक्षाची सुरुवात झाली, त्यावेळी मी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, पुढे काहीही झालं नाही. अरविंद केजरीवाल यांनी कुरुक्षेत्रातून सुशील गुप्ता यांना उमेदवारी दिली. कुरुक्षेत्रातील लोकांसाठी ते अनोळखी आहेत. ते दिल्लीचे असून त्यांना राज्यसभेवर पाठवले, हे योग्य नाही.”

केजरीवाल यांच्यावरील कारवाईबाबत विचारण्यात आलं असता, ते म्हणाले, “भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल हे स्वत: मद्य धोरणाच्या विरोधात होते. त्याविरोधात लढत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत मद्यधोरण राबवले. ईडीने त्यांना वेळोवेळी समन्स पाठवले. पण ते चौकशीसाठी गेले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली असावी.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do people of arvind kejriwals native place says about arrest in delhi excise case spb
First published on: 30-03-2024 at 18:59 IST