बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वेसर्वा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला आहे. त्यांचा पुतण्या आकाश आनंद हे मायावती यांचे उत्तराधिकारी असतील. रविवारी (१० डिसेंबर) लखनौ येथे बसपाची एक बैठक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बसपाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी मायावती यांनी आकाश आनंद हे माझे उत्तराधिकारी असतील, असे बसपाच्या नेत्यांना सांगितले. मात्र पक्षाने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश यांच्या म्हणण्यानुसार १४ दिवसांची पदयात्रा

बसपाच्या नेत्यांनी याबाबत माहिती दिलीआहे. मायावती यांनी आकाश यांच्यावर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व्यतिरिक्त अन्य राज्यांत पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवली आहे, असे या नेत्यांनी सांगितले. आकाश हे मायावती यांच्या धाकट्या भावाचे पुत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकादेखील बसपाने आकाश यांच्याच निरीक्षणाखाली लढवल्या होत्या. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात आकाश आनंद यांच्याच म्हणण्यानुसार बसपाने राजस्थानमध्ये १४ दिवसांच्या पदयात्रेचे आयोजन केले होते. ते या राज्यात पक्षाची जबाबदारी गेल्या वर्षापासून सांभाळत आहेत. मात्र या निवडणुकीत बसपा २०१८ सालाप्रमाणे खास कामगिरी करू शकली नाही. २०१८ साली बसपाने सहा जागांवर विजय मिळवला होता.

विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय संयोजक म्हणून नियुक्ती

मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतही आकाश यांचा प्रचार रणनीती ठरवण्यात सहभाग होता. जून महिन्यात मायावती यांनी आकाश आनंद तसेच राज्यसभेचे खासदार रामजी गौतम यांना या राज्यांत प्रचारनीती ठरवण्यासाठी केंद्रीय संयोजक म्हणून नियुक्त केले होते. ९ ऑगस्ट रोजी आकाश आनंद यांनी भोपाळमध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेचे नेतृत्व केले होते. उपेक्षितांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा राजभवनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तरीदेखील बसपा छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांत खास कामगिरी करू शकली नाही.

आनंद २०१७ साली भारतात परतले

आकाश यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केलेले आहे. व्यवस्थापन शाखेतील पदवी मिळवण्यासाठी ते पुढे लंडनला गेले होते. त्यानंतर २०१७ साली ते भारतात परतले होते. भारतात परतताच ते सक्रिय राजकारणात आले. २०१७ सालच्या मे महिन्यात सहारनपूर येथे ठाकूर-दलित यांच्यात वाद झाला होता. यावेळी आकाश आनंद हे मायावती यांच्यासोबत सहारनपूर येथे गेले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये मायावती यांनी आकाश आनंद यांची पक्षातील सर्व नेत्यांशी ओळख करून दिली होती.

आकाश आनंद यांनी घेतली होती मायावती यांची जागा

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद चांगलेच सक्रिय झाले होते. याच निवडणुकीदरम्यान मायावती यांनी ट्विटरवर आपले खाते उघडले होते. यामागे आकाश आनंद यांचाच विचार होता. २०१९ सालच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मायावती यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली होती. यावेळी मायावती यांची जागा घेत आकाश आनंद यांनी पक्षाचा प्रचार केला होता. या निवडणुकीत समाजवादी पार्टी, बसपा आणि आरएलडी या तीन पक्षांची युती होती. यावेळी एका सभेत आकाश आनंद हे अखिलेश यादव, तसेच आरएलडी पक्षाचे अध्यक्ष अजित सिंह यांच्यासोबत मंचावर बसले होते.

तरुणांना आकर्षित करण्याची जबाबदारी

या निवडणुकीत बसपा, आरएलडी आणि समाजवादी पार्टीच्या युतीचा पराभव झाला होता. त्यानंतर मायावती यांनी आकाश आनंद यांच्यावर तरुणांना आकर्षित करण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी आकाश आनंद यांची राष्ट्रीय संयोजकपदी नेमणूक करण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात पाठवले

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मायावती यांनी आकाश आनंद यांना उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात होते. संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करून पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची सध्या काय स्थिती आहे? हे जाणून घेण्याची जबाबदारी आकाश आनंद यांना दिली जाईल, असेही मायावती त्यावेळी म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is akash anand new successor of mayawati chief of bsp prd