Success Story: अनेक व्यक्ती आयुष्यात काहीतरी मोठे करायचे, हे स्वप्न पाहतात. पण, मेहनत घेऊनही ते स्वप्न कधी आणि कसे पूर्ण होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा ही स्वप्ने पूर्ण करताना अनेक अडथळेदेखील येतात. पण, तरीही आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहणारी व्यक्ती मागे हटत नाही. आज आम्ही अशाच एका मेहनती आणि संकटांवर मात करून यशस्वी झालेल्या एका व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत.

उत्तराखंडमधील संदीप पांडेने दिल्लीतील अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर सोडून नैनितालमध्ये हॉटेल उघडण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यासाठी तो बरीच मेहनतदेखील घेत होता. परंतु, त्याचे हॉटेल सुरू होणार इतक्यात २०१३ मध्ये आलेल्या भयानक पुराने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

या आपत्तीनंतर एके दिवशी संदीप एका शेतात फिरताना तिथे त्याला काही मजुरी करणाऱ्या महिला ‘पिस्यून लुन’ भाकरीबरोबर खाताना दिसल्या. पिस्यून लुन हे डोंगरावरील मीठ आहे; ज्याला अनेक जण गुलाबी मीठ किंवा हिमालयीन मीठदेखील म्हणतात. हे मीठ वरवंट्यावर वाटले जाते. यावेळी संदीपला या पारंपरिक मिठाचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली आणि त्याने यासाठी काम करायला सुरुवात केली.

असा सुरू झाला यशाचा प्रवास

२०१३ मध्ये केवळ १६० रुपये आणि त्याचे लहानपणीचे मित्र सौरभ पंत व योगेंद्र सिंग यांना जोडीला घेऊन संदीप यांनी हिमालयन फ्लेवर्ससाठी हिमफ्ला या कंपनीची स्थापना केली. हा व्यवसाय सुरू करण्यामागे बाजारात वेगळे उत्पादन घेऊन येणे हाच एक उद्देश नव्हता; तर त्या व्यवसायामागे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हादेखील हेतू होता.

या व्यवसायाच्या सुरुवातीला संदीपने वरवंटा, ताजी कोथिंबीर व हिरव्या मिरच्या खरेदी केल्या आणि जत्रेत एक छोटा स्टॉल लावला. अनोख्या चवीमुळे तीन दिवसांत सर्व माल विकला गेला. त्यानंतर हलद्वानी येथे झालेल्या मेळ्यांमध्ये त्याला आणखी यश मिळाले. हळूहळू संपूर्ण परिसरात त्यांच्या उत्पादनांना मागणी येऊ लागली. आज संदीपची हिमफ्ला ही कंपनी या मिठापासून ५५ प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करते; तसेच हे पदार्थ भारतात आणि परदेशांतही विकले जातात.

हेही वाचा: UPSC Success Story : IIT टॉपर पण UPSC परीक्षेत चार वेळा आले अपयश, आता आहे IAS अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिमफ्ला’च्या पदार्थांना परदेशांतही मागणी

आज संदीपच्या हिमफ्ला या कंपनीने खूप प्रगती केली असून, ही कंपनी आता दर महिन्याला या मिठापासून दोन हजार किलो चवदार चटणी व इतर पदार्थ तयार करते. हे पदार्थ भारतभर तसेच ऑस्ट्रेलिया, यूएस, यूके, दुबई, जर्मनी, सिंगापूर व ब्राझील यांसारख्या देशांतील ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. ‘हिमफ्ला’ची वार्षिक कमाई १.५ कोटी इतकी आहे.