कृष्णकथेतला सुदाम्याच्या पोह्यंचा प्रसंग खरा आहे की पाठभेद, कुणास ठाऊक, पण त्या प्रसंगाने पोह्यंसारखा एकदम साधा पदार्थ अजरामर करून टाकला आहे. सुदाम्याच्या पुरचुंडीतले घासभर पोहे खाऊन कृष्ण तृप्त झाल्यामुळे त्या पोह्यंना आजच्या भाषेत बोलायचं तर एकदम ग्लॅमरच आलं. त्यांचं प्रॉपर मार्केटिंग, ब्रॅिण्डग झालं. एरवी पोहे म्हणजे काय तर तांदळापासून बनवलेला एक घटक. तांदळापासून जसे चुरमुरे होतात, तसेच पोहेही.

पोहे म्हणजे मराठी घरांमध्ये उठता बसता खाल्लं जाणारं आजच्या भाषेतलं इन्स्टन्ट फूड. कोणत्याही खात्यापित्या घरात डाळ-तांदूळ-तेल-मीठ, चहा-साखर नाही, असं होत नाही, तसंच पोह्यंचंही. मराठी घरांमध्ये एक वेळ उपमा-उप्पीट फार नियमित केलं जात नाही, घरात रवा संपलाय आणि आणलाच नाही, असं होऊ शकतं. पण पोह्यंच्या बाबतीत असं शक्यच नाही. पोहे घरात असणारच. आणि नुसते असणार नाहीत तर ते नित्यनियमाने खाल्लेही जाणार.

पोहे खाण्याच्या तऱ्हाही किती. साधे फोडणीचे पोहे घेतले तरी नुसते कांदे पोहे, बटाटे पोहे, कोबी पोहे, वांगी पोहे.. किंवा यातलं काहीच न घालता भिजवून नुसती फोडणी घालून दिलेले पोहे. सहसा हिरवी मिरची घातलेले पिवळे धमक फोडणीचे पोहेच आपल्या नजरेला सवयीचे असतात, पण एखाद्याला हिरवी मिरची खायचीच नसते किंवा पोहे करायला घेतल्यावर मिरच्या संपल्याचं लक्षात आलं तर मग लाल तिखट घातलेले पोहे समोर येतात. ते अर्थातच वाईट लागत नाहीत चवीला, पण हिरव्या मिरच्या घातलेल्या पोह्यंची चव वेगळी आणि लाल तिखट घातलेल्या पोह्यंची चव चव वेगळी. त्यात पोह्य़ांत तिखटी हिरवी मिरची असेल तर पोह्य़ांचा इतका खमंग झणका लागतो की दोन घास जास्तच पोटात जातात.

पोहे चाळून घेऊन भिजवायचे, कांदे- बटाटे-मिरच्या-कोिथबीर चिरायची. कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची. तिच्यात आवडत असतील तर शेंगदाणे घालायचे. बटाटे किंवा कांदे, मिरच्या परतून घ्यायच्या. भिजवलेले पोहे परतायचे. मीठ घालायचं, वाफ आली की कोिथबीर, िलबू घातलं की फोडणीचे पोहे तयार. काही जण चवीत बदल हवा म्हणून बटाटे किंवा कांद्याच्या ऐवजी कोबी किंवा वांग्याच्या बारीक फोडी घालतात. पण पोह्य़ांची खरी ओळख कांदेपोहे किंवा बटाटेपोहे हीच. एके काळी याच कांद्यापोह्य़ांच्या माध्यमातून मुली बघण्याचा कार्यक्रम होऊन किती तरी संसार जुळले आहेत. काही ठिकाणी फोडणीचे पोहे  हरभऱ्याच्या र्तीमध्ये घालून खाल्ले जातात. एकूण काय तर इतकी साधी कृती. पण प्रत्येक हाताची चव वेगळी. या पोह्यंचं वैशिष्टय़ म्हणजे एखादे वेळी ते फार खमंग होणार नाहीत, पण बिघडणार नाहीत, हे नक्की. त्यांची कृतीच इतकी सोपी आहे की बिघडायला काही वावच नसतो. पोह्यंचा आणखी एक चांगुलपणा म्हणजे पोहे खाऊन पोट बिघडलं असं कधी कानावर येत नाही. काही अपवाद वगळले तर पोहे खाऊन कुणाचं पित्तही सहसा खवळत नाही.

पोह्यंचा एक गुणी, चविष्ट पण महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात केला जाणार अवतार म्हणजे दडपे पोहे. हा खास कानडी पदार्थ. त्यामुळे कोल्हापूर, सांगली अशा सीमाभागांत आवडीने खाल्ला जाणारा. दडपे पोहेसुद्धा इतके सोपे की ते बिघडू शकतच नाहीत. मुख्य म्हणजे करायला एकदम सोपे. त्यासाठी फोडणीच्या पोह्यंना लागतात ते जाड पोहे किंवा चिवडय़ाला वापरतात ते पातळ पोहे असे कोणतेही पोहे चाळून घ्यायचे. एकीकडे कांदा-कोिथबीर बारीक चिरून घ्यायची. ओला नारळ खवून घ्यायचा. हवं तर चवीपुरतं आलं किसून घ्यायचं. फोडणी तयार करायची. तिच्यात शेंगदाणे घालायचे. ती थंड होऊ द्यायची. एका पसरट भांडय़ात पोहे घेऊन त्यात कांदा, खोबरं, कािथबीर, आलं, चवीपुरतं मीठ घालायचं. थंड झालेली फोडणी घालून हे सगळं मिसळून घ्यायचं. आवडीनुसार त्यात टोमॅटो चिरून घालता येतो किंवा िलबू पिळता येतं. जाड पोह्यंचे दडपे पोहे केले असतील तर जरासा दुधाचा हात लावायचा. झाले दडपे पोहे तयार, ओला नारळ त्यांना एकदम चव देतो. पण ओला नारळ नसेल तरी दडपे पोहे करता येतात आणि चांगले होतात. मऊपणा आणण्यासाठी त्यात गाजर किसून किंवा काकडी कोचून घातली तरी चालते. पण ओल्या नारळाची चवच वेगळी. सीमा भागांत खूपदा फोडणी गार करून ती पातळ पोह्यंत मिसळून डबा भरून पोहे ठेवले जातात आणि आयत्या वेळी खवलेला नारळ, कांदा, कोिथबीर मिसळून खाल्ले जातात. त्याला लावलेले पोहे असंही म्हटलं जातं.

याशिवाय तेल-मीठ लावलेले पोहे हा पोह्यंचा आणखी एक टेस्टी प्रकार आहे. काहीही करायचा कंटाळा आलेला असतो, तोंडात टाकायला या पद्धतीचं खायला हवं असतं अशा वेळी जाड पोह्यंमध्ये म्हणजे कच्च्या पोह्यंमध्ये कच्चं म्हणजे बिनाफोडणीचं तेल, मीठ, लाल तिखट मिसळलं किंवा कारळ्याची चटणी मिसळली की झाले पोहे. कच्चे पोहे असल्यामुळे एकेक घास खूप वेळ चावावा लागतो. पण ते सगळं प्रकरणच खूप चविष्ट होतं आणि कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो.

अचानक भूक लागल्यावर पटकन करता येणारा पोटभरीचा प्रकार म्हणजे दही पोहे. पोहे भिजवून त्यात दही-दूध किंवा ताक घातलं, मीठ, चिमूटभर साखर घातली की झाले दही पोहे. चवीला लाल तिखट किंवा कांदे लसणाचा मसाला किंवा कोणतीही चटणी घातली की ते घासभर जास्तच पोटात जातात. असे पोहे करण्यासाठी कसलीच दगदग नाही की काही नाही. हे सगळे घटक पोटात गेले की चार-पाच तास तरी पोटोबा आपल्याला हाक मारत नाहीत. दही पोहे खायचे नसतील तर पोह्यंमध्ये दूध, गूळ किंवा साखर घातली की सुंदर नाश्ता होतो. असंही नको असेल तर पोहे भिजवायचे, त्यात कच्चं तेल, भाजलेले शेंगदाणे, तिखट, मीठ हवं तर कांदा-कोिथबीर घालायची. असे पोहे भिजवलेले असल्यामुळे फार चावायला लागत नाहीत इतकंच.

कोकणात दिवाळीत केला जाणारा कोळाचे पोहे हा पदार्थ देशावर सहसा केला जात नाही. पण तो पोह्यंचा आणखी एक चविष्ट अवतार, त्यासाठी पोह्य़ात नारळाचं दूध, गूळ आणि चिंचेचा कोळ घातला जातो. काही ठिकाणी चवीला हिरवी मिरची, कोथिंबीरही काही ठिकाणी घातली जाते. एकदा हे पोहे खाल्ले की त्यांची चव विसरताच येत नाही असं खाणारे सांगतात.

याशिवाय पोह्यंचा चिवडा हा अध्याय तर आणखी वेगळा. त्याबद्दल नंतर कधीतरी.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com