28 January 2020

News Flash

खमंग उपवास

साबुदाण्याची खिचडी हा असा पदार्थ आहे, जो उपवास करणाऱ्याला सोडून बाकी सगळ्यांना खायचा असतो.

साबुदाण्याची खिचडी हा असा पदार्थ आहे, जो उपवास करणाऱ्याला सोडून बाकी सगळ्यांना खायचा असतो. तिला खमंग पर्याय साबुदाणा वडय़ांचा. पण हे वडे बाहेर कुठेकुठे हॉटेलात मिळतात तसे गिच्चगोळा असता कामा नयेत. हातात धरल्यावर त्याचा असा अलगद तुकडा मोडता आला पाहिजे आणि तो तुकडा इतका खुसखुशीत की तोंडात टाकल्याबरोबर कुरकुरीतपणाची, खमंगपणाची जाणीव करून देत विरघळला पाहिजे. तसा साबुदाणा वडा जमणं म्हणजे एखादी गाण्याची मफल जमण्यासारखंच. अर्थात असा वडा जमण्यासाठी पहिली अट असते ती साबुदाणा खिचडीला भिजवतो तसा चांगला भिजण्याची. साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून तो ठेवला तर तीनचार तासांत तो भिजतो. अशा भिजलेल्या साबुदाण्यात वाटलेली हिरवी मिरची किंवा लाल तिखट, मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट एकदम मोकळं फळफळीत पण बारीक केलंलं आणि तेही हात अगदी भरपूर सल साडून घालायचं. साबुदाण्यापेक्षा दाण्याचं कूट अंमळ जास्त झालं तरी हरकत नाही. आणि थोडंसं राजगिऱ्याचं किंवा उपवासाच्या भाजणीचं पीठही घालायला हरकत नाही. हे सगळं मिश्रण शक्यतो पाणी न घालता मळून घ्यायचं. साबुदाणा चांगला भिजलेला असल्यावर पाणी घालण्याची खरं तर वेळच येत नाही. आणि मग त्याचे छोटे गोळे करून हातावर वडे थापून ते तळायचे. भरपूर प्रमाणात घातलेलं दाण्याचं कूट, राजगिऱ्याचं पीठ यांच्यामुळे वडे आपोआपच मस्त खुसखुशीत होतात.
या वडय़ांसारखाच उपवासाचा खमंग प्रकार म्हणजे साबुदाण्याचं थालीपीठ. हे थालीपीठही नुसतं साबुदाण्याचं केलं तर त्याचा नुसताच लोळागोळा होतो. म्हणून मग उपवासाच्या थालीपीठासाठीही चांगला भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, उपवासाच्या थालीपीठाचं पीठ आणि उकडलेले बटाटे कुस्करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ, लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचं तिखट घालून हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आणि फ्राय पॅनमध्ये साजूक तूप घालून ही थालपीठं करायची. ती तेलात केली तर फारशी खुसखुशीत होत नाहीत; पण तुपात मात्र खमंग आणि खुसखुशीत होतात. आणि ती गरमागरम खायलाच एकदम मस्त लागतात. नुसत्या उपवासाच्या भाजणीच्या थालीपीठापेक्षा असं हे दोनतीन घटक एकत्र करून केलेलं थालीपीठ एकदमच खमंगटमंग लागतं.
पण साबुदाण्याची खिचडी काय, वडे काय आणि थालीपीठ काय, खरंतर हे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ. त्यांच्यातले घटक पदार्थ पाहिले तर उपवासापेक्षा हेवी नाश्त्याला एकदम योग्य ठरतील असे. पण साबुदाण्याचाच फारसा न खाल्ला जाणारा, फारसा माहीतही नसलेला, पण उपवासासाठी एकदम सेफ आणि चांगला पदार्थ म्हणजे दह्यतले साबुदाणे. त्यातल्या दह्यमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि साबुदाण्यामुळे पोटही छान भरतं. हलकंही राहतं. मुख्य म्हणजे हा पदार्थ करायलाही एकदम सोपा. साबुदाणे चांगले भिजवून घेतले की खायच्या वेळेला ते सारखं करून घेतलेल्या दह्यत घालायचे. चवीपुरतं मीठ, साखर, दाण्याचं कूट घालायचं. हवं तर लाल तिखट, जिरेपूड भुरभुरायची. खमंगपणा हवाच असेल तर हिरवी मिरची घालून जिऱ्याची, तुपातली फोडणी द्यायची, नाहीतर तसंच खायचं. अनेकांना आवडत नाही म्हणून, नाहीतर साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याची खीर किंवा मीठ घालून केलेली लापशी हे पदार्थ पचायला जास्त हलके.
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा पचायला हलका उपवासाचा पदार्थ म्हणजे वऱ्याचे तांदूळ किंवा भगर. तिची जोडी सहसा महाशिवरात्रीला शेंगदाण्याच्या आमटीबरोबर जमवली जाते. पण आपल्या उपम्यासारखा याचा उपमा केला तर तो करायला सोपा, पचायला हलका असा हा उपवासाला आणि एरवीपण नाश्त्याला एकदम सही पदार्थ. मात्र त्यासाठी वरई किंवा भगर नुसतीच पाण्यात घालून एकदम शिजवून नाही घ्यायची. तर उपम्यासाठी रवा भाजतो तशी ती भाजून घ्यायची. हिरवी मिरची आणि बटाटे बारीक चिरून घ्यायचे. मग छोटा राइस कूकर घ्यायचा. त्यात जिऱ्याची तुपातली फोडणी करायची. त्यात मिरची बटाटे परतून घ्यायचे. हे करत असताना दुसऱ्या गॅसवर आधण ठेवायचं. ते पाणी चांगलं तापलं की ते या फोडणीत घालायचं. त्यात मीठ घालून चांगलं उकळू द्यायचं. उकळी फुटली की त्यात भाजलेली वरई घालायची आणि चांगल्या साताठ शिट्टय़ा द्यायच्या. हा तांदूळ मोकळा व्हायला हवा असेल तर पाणी कमी घालायचं आणि छान मऊ हवा असेल तर पाणी भरपूर घालायचं. वरईचा हा उपमा गरम असताना तूप घालून चांगला लागतो आणि गार झाला तर दह्यबरोबर चांगला लागतो. याच वऱ्याच्या तांदळाचा आपण एरवी करतो तसा उपवासाचा शिराही केला जातो आणि तो आवडीने खाल्लाही जातो.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 17, 2016 1:01 am

Web Title: sabudana vada recipe
Next Stories
1 दुप्पट खाशी…
2 सगळीकडे बटाटा!
3 कवतिक कैरीचं
Just Now!
X