16 December 2017

News Flash

माहितीचे पाटबंधारे!

सोमच्या लढाईत पहिल्याच दिवशी ५७ हजार ब्रिटिश सैनिक जखमी झाले होते.

रवि आमले | Updated: May 29, 2017 4:40 AM

सोमची लढाई  कशी घनघोर झाली हे दाखवून देणारे छायाचित्र

सोमच्या लढाईत पहिल्याच दिवशी ५७ हजार ब्रिटिश सैनिक जखमी झाले होते. त्यातील १९ हजार जणांचा मृत्यू झाला होता.मात्र युद्ध वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांत म्हटले हा दिवस इंग्लंड आणि फ्रान्ससाठी चांगला गेला. युद्धातील आश्वासक असा हा दिवस होता..

सोमची चढाई. ही पहिल्या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई. ब्रिटिश आणि फ्रेंच फौजा विरुद्ध जर्मन लष्कर यांच्यात फ्रान्समधील सोम नदीकिनारी झालेली. साडेचार महिने ती चालली. ३० लाख सैनिकांनी त्यात भाग घेतला. त्यातील दहा लाख मेले वा जखमी झाले. हिटलर त्या जखमींतला एक.

या युद्धाच्या वार्ताकनासाठी ब्रिटिश सरकारने आपल्या लष्करासमवेत पाच वार्ताहरांना पाठविले होते. ‘एम्बेडेड जर्नालिझम’चे हे खास उदाहरण. पुढे आखाती युद्धातही ही कटी-बद्ध पत्रकारिता आपणांस दिसली. त्या वेळी अमेरिकी लष्कराबरोबर काही वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार पाठविण्यात आले होते. त्यांनी सैनिकांबरोबरच राहायचे. त्यांच्याबरोबरच खायचे-प्यायचे. त्यांच्या मागे जायचे आणि त्यांच्या शौर्याच्या गोष्टी वाचकांना सांगायच्या, अशी ही पद्धत. यातून म्हणे युद्धाचे योग्य वार्ताकन होते.

तर डेली क्रॉनिकलचे फिलिप गिब्ज, रॉयटर्सचे हर्बर्ट रसेल हे त्या वेळी फ्रान्समध्ये ब्रिटिश लष्करी मुख्यालयात राहून पत्रकारिता करीत होते. तेथून आपापल्या संस्थेला बातम्या पाठवीत होते. त्यातील काही लष्कराकडून सेन्सॉर केल्या जात होत्या. काही पुढे पाठविल्या जात होत्या. माहितीचा प्रवाह नियंत्रित करणे हे प्रोपगंडातील महत्त्वाचे तत्त्व. ते पाळले जात होते. लष्कराकडून आणि महत्त्वाचे म्हणजे वार्ताहरांकडूनही. गिब्ज सांगतात, ते स्वत:च स्वत:चे सेन्सॉर बनले होते.

तर सोमच्या लढाईच्या पहिल्या दिवसाची, १ जुलै १९१६ची बातमी गिब्ज यांनी त्यांच्या दैनिकाला पाठविली. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘संतुलितपणे सांगायचे तर आपण असे म्हणू शकतो की हा दिवस इंग्लंड आणि फ्रान्ससाठी चांगला गेला. युद्धातील आश्वासक असा हा दिवस होता.’

रसेल यांनीही रॉयटर्सला अशीच तार पाठविली होती. त्यात म्हटले होते, ‘ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्ससाठी हा दिवस अतिशय चांगला चालला आहे..’

परंतु वस्तुस्थिती काय होती? त्या पहिल्याच दिवशी ५७ हजार ब्रिटिश सैनिक जखमी झाले होते. त्यातील १९ हजार जणांचा मृत्यू झाला होता.

परंतु युद्धात असाच प्रचार केला जातो. शत्रू हा आक्रमक असतो. क्रूर आणि लबाड असतो. तो करतो ती ‘दर्पोक्ती’च असते आणि अखेर हानी त्याचीच होत असते. वर्षांनुवर्षे अशाच प्रकारचा, असत्ये आणि अर्धसत्ये यांवर आधारलेला प्रोपगंडा चाललेला आहे. पहिल्या महायुद्धातही हेच झाले होते. युद्धपत्रकार आणि समीक्षक फिलिप नाईटली सांगतात, ‘इतिहासातील कोणत्याही काळात सांगितले गेले नसेल, एवढे खोटे या काळात जाणीवपूर्वक सांगण्यात आले. या काळात राज्याची सर्व यंत्रणा सत्य गाडून टाकण्याच्या कामी लागली होती.’

हा काळ प्रोपगंडाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा गणला जातो. याच काळात प्रोपगंडाची अनेक तंत्रे तयार झाली. साधने विकसित झाली. त्यांचे उद्दिष्ट एकच होते. एखादे कृत्य, कल्पना वा गट आणि सामान्य लोक यांच्यात जे संबंध असतात ते प्रभावित करायचे. त्यासाठी घटना तयार करायच्या वा त्यांना वळण द्यायचे. आधुनिक प्रोपगंडा हेच करीत होता. लॉईड जॉर्ज हे १९१५ ते १८ या काळातील ब्रिटनचे युद्धमंत्री. (हल्ली युद्धमंत्री नव्हे, संरक्षणमंत्री म्हणतात. हा नामबदल हाही प्रोपगंडाचाच भाग. ते ‘डबलस्पीक’चे उदाहरण. त्याबद्दल पुढे चर्चा करूच.) तर ब्रिटिशांच्या युद्ध खात्याबद्दल बोलताना एकदा ते म्हणाले होते, की ‘त्यांनी तीन प्रकारची आकडेवारी तयार करून ठेवलेली होती. एक जनतेची दिशाभूल करण्यासाठी. दुसरी सरकारची दिशाभूल करण्यासाठी आणि तिसरी स्वत:ला फसवण्यासाठी.’ ही बनवाबनवी – अमेरिकेतील कमिटी ऑन पब्लिक इन्फर्मेशन या प्रोपगंडा यंत्रणेचे अध्यक्ष जॉर्ज क्रील यांच्या भाषेत सांगायचे तर – मनुष्यजातीचे मन जिंकण्यासाठी करण्यात येत होती. ‘हाऊ  वुई अ‍ॅडव्हर्टाइज्ड अमेरिका’ या त्यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचे नावच – ‘द फाइट फॉर द माइंड ऑफ मॅनकाइंड’ असे आहे. ही फसवणूक एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत होती, की त्यातून एरवी शांतताप्रिय असलेले सभ्य नागरिकही तोंडाला रक्त लागल्यासारखे वागू लागले होते. सरकार जे सांगते तेच अंतिम सत्य हे एकदा मनावर बिंबल्यानंतर त्यांना त्या कथनामध्ये वाहून जाण्याखेरीज अन्य पर्यायही नव्हता. युद्धकाळातील सर्वच देशांतील बहुतेक माध्यमे सरकारी प्रोपगंडाची वाहक बनली होती. अमेरिकेतील वृत्तपत्रे ‘सरकारी सत्य’च सांगतील हे पाहण्याचे काम क्रील समितीकडे होते. आपण माध्यमस्वातंत्र्याच्या बाजूचेच आहोत, सेन्सॉरशिपला आपला विरोध आहे असे सांगतानाच ही समिती देशभक्तीच्या नावाखाली वृत्तपत्रांवर ‘खुशीचे सेन्सॉर’ लादत होती. त्याच वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय म्हणत होते, की ‘शांततेच्या शक्यतेबद्दलची चर्चा हा असा एक मुद्दा आहे की ज्यात धोकादायकतेचा भाग असू शकतो. कारण त्या शक्यतेचा उगम शत्रुराष्ट्रात असू शकतो.’ थोडक्यात शांततेबद्दल बोलणारे शत्रुराष्ट्राचे हस्तक असू शकतात. जसे की युजीन व्ही. डेब्ज.

हे अमेरिकेतील सोशालिस्ट पार्टीचे बडे नेते. १६ जून १९१८ रोजी ओहायोत केलेल्या भाषणाबद्दल त्यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कारण? त्या भाषणातून ते सांगत होते, की ‘मध्ययुगातले सरंजामशहा त्यांची सत्ता, शक्ती, प्रतिष्ठा, संपत्ती वाढविण्यासाठी एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारत असत. ते स्वत: मात्र कधीही युद्धात उतरत नसत. आता आधुनिक सरंजामशहा, वॉल स्ट्रीटचे नबाब युद्ध पुकारतात.. सत्ताधारी वर्ग नेहमीच युद्ध पुकारतो आणि सर्वसामान्य प्रजा नेहमीच युद्ध लढते.’ सर्वच युद्धांना विरोध करणाऱ्या या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आणि नुकत्याच तयार करण्यात आलेल्या हेरगिरी कायद्यान्वये शिक्षा ठोठावण्यात आली. या कायद्यान्वये युद्धभरती मोहिमेत अडथळे येतील अशा ‘खोटय़ा’ बातम्या देणे बेकायदेशीर ठरविण्यात आले होते. आणि ‘खोटय़ा’ बातम्या कशाला म्हणायचे, तर क्रील समितीच्या प्रोपगंडाशी ज्या मेळ खात नाहीत त्यांना. हे असेच रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याबाबतीत ब्रिटनमध्ये घडल्याचे यापूर्वी आपण पाहिले आहे. अशा सर्व बाबतीत ‘नेम कॉलिंग’ – बद-नामकरणाचे तंत्र वापरण्यात आले होते.

हा प्रोपगंडा एवढा प्रबळ होता, की सामान्य नागरिकांना त्या पलीकडेही काही असू शकते असे वाटतच नव्हते. ‘मँचेस्टर गार्डियन’चे संपादक सी. पी. स्कॉट यांच्याशी बोलताना एकदा लॉईड जॉर्ज म्हणाले होते, ‘खरे काय ते लोकांना खरोखरच समजले ना, तर हे युद्ध उद्याच थांबेल. पण अर्थातच त्यांना ते माहीत नाही आणि माहिती होणारही नाही.’

खरे तर तसे झाले नाही. लोकांना उशिरा का होईना, ते समजलेच. परंतु युद्धकाळात मात्र बहुसंख्य लोक त्या प्रचाराचे बळी ठरले होते. कारण त्या काळातील सर्वच माहिती प्रवाह व्यवस्थित नियंत्रित केला जात होता. या नियंत्रणाचे दोन प्रकार आहेत. एक – सकारात्मक नियंत्रण. आपणच माहितीचा स्रोत वा प्रसारकर्ते बनायचे. आपणांस हवी ती आणि तेवढीच माहिती द्यायची. आणि दुसरे नकारात्मक नियंत्रण. यात आपणांस नको असलेली किंवा आपल्या माहितीशी विसंगत बाब पुढे येऊच द्यायची नाही. हल्ली बहुसंख्य राजकीय नेते, वलयांकित व्यक्ती माहिती-प्रवाहावर सकारात्मक नियंत्रण ठेवताना दिसतात. ट्विटर, इन्स्टाग्राम ही त्याची साधने बनली आहेत. एखाद्या नेत्याला एखादी माहिती वा मत मांडायचे असेल, तर यापूर्वी त्याला पत्रकार परिषदांवर, पत्रकांवर विसंबावे लागत असे. परंतु त्यातून येणाऱ्या अंतिम माहितीवर त्याचे नियंत्रण नसे. आता ट्विटरसारख्या समाजमाध्यमामुळे तो सर्व माहिती नियंत्रित ठेवू शकतो. त्याला पत्रकार परिषदांची गरज राहिलेली नाही.

युद्धकाळात माहिती-प्रवाहात हे पाटबंधारे घालण्याचे काम सेन्सॉर नामक यंत्रणा करीत असे. जनसंज्ञापनतज्ज्ञ डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक सांगतात, की या युद्धात दोस्त राष्ट्रांचे मिळून किमान ४० लाख सैनिक ठार झाले. परंतु त्याची छायाचित्रे अभावानेच दिसली. हेच ९/११च्या वेळीही प्रकर्षांने दिसले. हे माहिती-प्रवाहाचे नियंत्रण. आणि ते केवळ अमेरिकेत वा ब्रिटनमध्येच घडत होते असे नाही. फ्रान्स, जर्मनी, इटली.. सर्वत्र प्रोपगंडाची अशा प्रकारची तंत्रे वापरली जात होती. पहिले महायुद्ध सुरू असतानाच तिकडे रशियामध्ये साम्यवाद्यांनी झारशाहीविरोधात लढा उभारला होता. त्यातही प्रोपगंडाच्या साह्य़ाने सर्वसामान्यांना युद्धाला भाग पाडण्यात येत होते. फरक एवढाच होता, की त्या युद्धाचे नाव वर्गलढा असे होते..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

First Published on May 29, 2017 4:40 am

Web Title: war between britain and france marathi articles