News Flash

पितृऋण व पक्षी

‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा विषय मनाला अगदी भिडलाच.

16-lp-minal‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा विषय मनाला अगदी भिडलाच. वडील, मुलगा व सून यांच्या छोटेखानी कुटुंबात सुरुवातीला असणारा नात्यांचा समभुज त्रिकोण बघता बघता काटकोन त्रिकोणात परावर्तित होतो, वडील-सुनेतील अंतर वाढत जाऊन त्याचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत होते.

पण आपले खरे आयुष्य म्हणजे असे काल्पनिक कथानक नव्हे; त्यातून दोन पिढय़ांमधील नात्याला तर इतके पदर असतात की त्या कमळपत्रांच्या जाळीतून अलगदपणे सोडवणूक करून घेणे एखाद्या कुशल मानसशास्त्रज्ञालाही  कठीणच.

दोन पिढय़ांमधील नात्यांचा विषय चच्रेला येतो, तेव्हा आपोआपच तेथे दोन गट पडतात. एक ज्येष्ठ पिढीची बाजू घेणारा, आक्रमक  तर दुसरा अर्थातच तरुणांची बाजू घेणारा, बचावात्मक. ज्येष्ठ नागरिक वयाच्या ज्येष्ठतेमुळे व इतर दुर्बलतेमुळे सहानुभूतीस पात्र; तरुणवर्ग सर्व प्रकारच्या सबलतेमुळे पण ज्येष्ठांच्या दु:खांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत होत असल्यामूळे बऱ्याचदा तोफेच्या तोंडी दिल्यासारखा! आपल्या चित्रपट, नाटक, मालिकांनी हे साचे आणखीनच बांधीव केले आहेत.

साचेबद्धपणाचे एक मजेदार उदाहरण- ‘यांनी नक्कीच घरातील ज्येष्ठ व्यक्तींना छळलेले दिसते, आणि आता काहीतरी तात्त्विक मुलामा देऊन सारवासारव करत आहेत’.

असे दृढ पूर्वग्रह व साचेबद्धपणा यांच्या चाकोरीतून बाहेर येऊन आपण नात्यांकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघायला हवे. तरच दोन पिढय़ांच्या नात्यांमध्ये ताजेपणा येईल. त्यासाठी ती चाकोरी निर्माण होण्याच्या काही कारणांची चाचपणी करायला हवी.

बऱ्याचदा आपण ‘ज्येष्ठ नागरिक’ हा बंदिस्त, स्थिर गट आहे, असे समजतो. पण प्रत्यक्षात तो प्रवाही गट आहे. आज जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते कालपर्यंत तरुण पिढीचे प्रतिनिधी होते. आणि आज जे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत, ते उद्या ‘ज्येष्ठ नागरिक’ गटाचे प्रतिनिधी होणार आहेत. आपण कुठल्या गटात, हे आपण स्वेच्छेने ठरवू शकत नाही, निसर्गनियमानुसार निश्चित होणाऱ्या आपल्या वयानुसार ते ठरते. हा निसर्गनियम जाणून घेतला की या दोन (शत्रु) गटांच्या परस्परांबद्दलच्या तक्रारी कमी होतील. ‘आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार’ याचीही जाणीव होईल.

सामान्यत: ज्येष्ठ नागरिक गटाचे सदस्य भूतकाळात आपणही तरुण पिढीचे सदस्य होतो, हे विसरून जातात. तसेच तरुण पिढीच्या सदस्यांना कालांतराने आपणही ज्येष्ठ नागरिक गटात प्रवेश करणार आहोत, याचे भान राहात नाही. यामुळे प्रतिपक्षावरील हल्ल्याला धार चढते, काही वेळा अविवेकीपणाही डोकावतो.

विवेकी विचार केल्यास ज्येष्ठांच्या पिढीला हे समजेल की तरुण पिढीचे खास गुणधर्म आपल्यातही पूर्वी होते, तरुणांना दूषणे देणे म्हणजे स्वत:लाच दूषणे देण्यासारखे आहे. तरुण पिढीलाही समजेल की ज्येष्ठ नागरिकांची दु:खे व काळज्या यांचा आपल्याला आज अनुभव नसला तरी कालपरत्वे आपणही त्या दिशेने वाटचाल करणार आहोत. त्यांच्याबद्दल तिरस्कार म्हणजे आपल्या भविष्यातील तिरस्काराची तरतूद!

‘ज्येष्ठ नागरिक’ संकल्पनेचे प्रवाहीपण मान्य केले की आपण पूर्वी जे पेरले असेल त्याचीच फळे आपल्याला मिळणार, आपल्याला समाधानी भविष्य हवे असेल तर त्याची बीजे आत्तापासूनच पेरायला हवीत हे सहज लक्षात येईल. तेव्हा हा मुद्दा प्रेमाच्या पेरणीचा आहे. प्रेमाची तरतूद आत्ता केली नाही, तर ते भविष्यात कसं मिळणार?

या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक  असहमती दर्शवतील. पण यात त्यांना दुखवण्याचा उद्देश नाही. जिथे दोन पिढय़ांमधील अंतर ताणले गेले आहे, तेथे दोघांनीही स्वत:लाच हे प्रश्न विचारायला हवेत. परंतु आत्मपरीक्षण करण्याची व स्वत:कडे दोष घेण्याची आपली अजिबात तयारी नसते. प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. ‘मी का पुढाकार घ्यायचा?’ हा प्रश्न तर्कशुद्ध असला तरी व्यवहारात असमंजसपणाचा ठरेल.

ज्येष्ठ पिढीचे तरुणांविरुद्धचे युक्तिवाद ‘पितृऋण’  संकल्पनेभोवती फिरतात. ‘आम्ही यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, हौसमौज बाजूला ठेवली. आता आमच्याकडे लक्ष पुरवणे त्यांचे कर्तव्य नाही का?’’

तरुण पिढीचे युक्तिवाद ‘पक्षी’ संकल्पनेभोवती फिरतात. ‘एवढी वष्रे मेहनत करून शिक्षण घेतले ते काय इथे बसून वाया घालवायचे? पक्ष्यांची पिल्ले पंखात बळ आल्यावर घरटय़ातून उडून जातात. आम्हालाही स्वातंत्र्यभरारी घेऊ दे. आमच्या पायांत जबाबदारीच्या बेडय़ा अडकवू नका.’

ज्येष्ठांनी ‘पितृऋण’ तरुणांनी ‘पक्षी’ दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे स्वाभाविकच आहे. पण ‘केवळ माझा दृष्टिकोनच खरा’ या भावनेने त्याचा अंगीकार केला तर कडवटपणाची धार वाढत जाते.

‘पण अशा परिस्थितीत समंजसपणा तरी कसा दाखवायचा?’

शंका रास्त आहे, पण एक लहानसा प्रयोग करून बघावा लागेल. दृष्टिकोनांची अदलाबदल करण्याचा.

ज्येष्ठांनी  ‘पितृऋण’ दृष्टिकोन सोडून ‘पक्षी’ दृष्टिकोन स्वीकारायचा; तरुणांनी ‘पक्षी’ दृष्टिकोन सोडून  ‘पितृऋण’ दृष्टिकोन स्वीकारायचा.

यानंतरची त्यांची मनोगते साधारणत: अशी होतील :

ज्येष्ठ, ‘‘आपल्या पिल्लांच्या पंखात आता भरारी घेण्याइतकं बळ आलं आहे. त्यांच्या पायात आमच्या बेडय़ा कशाला? कर्तव्य पार पाडल्याचं केवढं समाधान आमच्या गाठीशी आहे.’’

तरुण, ‘‘करिअर महत्त्चाचं आहेच. पण ज्यांच्या खांद्यावर पाय ठेवून वर चढलो, त्या खांद्यांना आधार देणंही महत्त्वाचं आहे. ते ओझं नाही, प्रेमाची जबाबदारी आहे.’’

कुणाला हा बालीशपणा किंवा युटोपिया वाटेल. पण हा आहे प्रेमाचा प्रयोग. कोणालाही करता येण्यासारखा. फक्त एक काळजी घ्यायची, प्रयोग निरपेक्षपणे करायचा. मी दृष्टिकोन बदलला म्हणून समोरच्याने बदललाच पाहिजे, अशी अपेक्षा ठेवायची नाही. प्रेम आपण करायचं, दुसऱ्याकडून वसुली करण्याचा उद्देश ठेवून कसं चालेल?

चला, एकदा तरी निरपेक्ष प्रेम करायला धाडसाने पुढे पाऊल टाका. कदाचित, तुमचं जग आरपार बदलून जाईल.

सर्वानाच या प्रेमाच्या प्रयोगासाठी हार्दिक शुभेच्छा!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:13 am

Web Title: generation gap 2
Next Stories
1 तुम जियो हजारों साल
2 रसनातृप्ती ते खाद्यसंस्कृती
3 नातिचरामि ?
Just Now!
X