प्रो-कबड्डीने देशातल्या सामन्य घरांमधून आलेल्या मुलांना एक नवीन ओळख मिळवून दिली. अल्पावधीतचं क्रिकेटसारख्या खेळाला कडवी टक्कर देत कबड्डीने देशभरात आपले हक्काचे प्रेक्षक जमवले आहेत. अनुप कुमार, गिरीश एर्नाक, प्रदीप नरवाल, सिद्धार्थ देसाई, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा यांच्यासारख्या खेळाडूंना लोकं ओळखायला लागली. गेल्या काही हंगामात पुणेरी पलटणचं नेतृत्व करणारा व यंदाच्या हंगामात अनुपच्या नेतृत्वाखाली जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणाऱ्या दिपक निवास हुडाने आपल्या खेळाने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. मात्र या स्तरावर पोहचण्यासाठी दिपकने आपल्या इंजिनीअर बनण्याच्या स्वप्नांना मुरड घातली आहे. प्रो-कबड्डीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिपक हुडाने आपली कहाणी सांगितली.

“मला इंजिनीअरींगचा अभ्यास करायचा होता. मात्र त्यावेळी परिस्थिती एवढी कठीण होती की मला तो विचार सोडून द्यावा लागला. यानंतर परिवाराची गरज भागवण्यासाठी मी शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली, यावेळीच माझ्यातली कबड्डीची आवड खऱ्याअर्थाने पुन्हा एकदा जागृत झाली. यानंतर बहीण आणि तिच्या मुलांना वाढवायची जबाबदारीही माझ्या खांद्यावर आली. याचवेळी मी व्यवसायिक कबड्डीपटू होण्याचा निर्णय घेतला.” दिपक आपल्या कबड्डीच्या आवडीविषयी बोलत होता.

कबड्डीमुळेच मला पहिली चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. माझ्या नोकरीमुळे मी माझ्या बहिणीच्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ शकणार होतो. मी त्यावेळी खूप लहान होतो, मात्र मी स्वतःला झोकून देत कबड्डीचा सराव करत गेलो, त्याचाच मला फायदा झाला. कबड्डीचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे सांगताना दिपकने माहिती दिली. प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात दिपक निवास हुडाला 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लावत जयपूरच्या संघाने आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. यंदाच्या हंगामात दिपक आणि जयपूरला मनासारखी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये, मात्र आगामी सामन्यांमध्ये आपण चांगली कामगिरी करु असा आत्मविश्वास दिपकने व्यक्त केलाय.