क्रिकेटवेड्या भारताला प्रो-कबड्डीने एक पर्याय दिला. गेल्या ५ हंगामांमध्ये क्रीडा प्रेमींनी कबड्डीच्या सामन्यांना भरघोस प्रतिसाद दिला, मात्र सहाव्या हंगामात सुरुवातीचे काही आठवडे प्रो-कबड्डीच्या आयोजकांसाठी जरा कठीण जात आहेत. पहिल्या २४ सामन्यांनंतर प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती BARC (Broadcast Audience Research Council) च्या सर्वेक्षणामध्ये समोर आली. पाचव्या हंगामाच्या तुलनेत सहाव्या हंगामात पहिल्या १२ सामन्यांनतर प्रेक्षकसंख्येत ३१ टक्क्यांची घट झाली. शहरी भागात ही घट २५ टक्के तर ग्रामीण भागात ही घट ३३ टक्क्यांवर गेलेली आहे. तब्बल 12 संघाचा सहभाग असलेली ही स्पर्धा तब्बल ९ वाहिन्यांवरुन प्रसारित केली जाते. देशभरात अंदाजे २३ कोटी ७ लाख लोकांनी सहाव्या हंगामातले पहिले २४ सामने पाहिले. पाचव्या हंगामात पहिले २४ सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही अंदाजे ३४ कोटीच्या घरात होती. याचसोबत सामने प्रसारित करणाऱ्या ९ वाहिन्यांपैकी एकाच वाहिनीला जास्त टीआरपी मिळालेला आहे.

पाचव्या हंगामापर्यंत आयपीएल नंतर सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या मिळालेला खेळ म्हणून कबड्डीने नाव कमावलं. मात्र सहाव्या हंगामात नेमकं गणित बिघडलं कुठे. मात्र गेल्या काही दिवसांमधील घडामोडींचा अभ्यास केला तर, प्रेक्षकसंख्या कमी होण्यामागची दोन कारणं समोर आली आहेत.

१) टिव्हीवरील अन्य कार्यक्रम आणि क्रिकेटशी स्पर्धा –

भारतीय क्रिकेट संघ जेव्हा घरच्या मैदानावर सामने खेळतो, तेव्हा टिव्हीवर त्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळते. त्यामुळे याआधी कबड्डीने निर्माण केलेला प्रेक्षकवर्ग हा क्रिकेट सामन्यांमध्ये विभागला गेला. मात्र ज्या दिवशी क्रिकेटचे सामने नसतात, त्यादिवसांमध्ये कौन बनेगा करोडपती, बिग बॉस यांसारख्या कार्यक्रमांकडे प्रेक्षकांचा ओढा असतो, महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कार्यक्रमांनी प्रेक्षकांना आपल्याशी बांधून ठेवण्यात यश मिळवलेलं दिसतं आहे. यामुळे कबड्डीच्या प्रेक्षकसंख्येवर परिणाम झाल्याचं बोललं जातं आहे.

२) वेळापत्रकांमधला बदल आणि वाढलेला संभ्रम –

गेल्या पाच हंगामांमधलं उहाहरण घ्यायचं ठरवलं तर प्रो-कबड्डीचे सामने हे जुन-जुलैच्या हंगामात सुरु होईन दिवाळीपर्यंत संपायचे. मात्र यंदा आशियाई खेळ आणि कबड्डी मास्टर्स स्पर्धेमुळे प्रो-कबड्डीचा हंगाम आयोजकांनी पुढे ढकलला. याचसोबत कबड्डी महासंघावर दिल्ली उच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकामुळे सहावा हंगाम होतो की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला. यादरम्यान पुन्हा एकदा सहाव्या हंगामाची तारिख बदलण्यात आली. त्याचसोबत ऑक्टोबर महिना हा भारतामध्ये सणासुदीचा महिना मानला जातो. भारताच्या विविध राज्यांमध्ये लोकं नवरात्री व अन्य सणांमध्ये व्यस्त असतात. अशावेळी रात्री ८ वाजताचा वेळ कबड्डीच्या सामन्यांसाठी देणं हे कोणालाही शक्य नसतं.

त्यामुळे वेळापत्रक आखताना आयोजकांनी या सर्व बाबी नजरअंदाज केल्या का असा सवाल गेले काही दिवस सोशल मीडियावर विचारला जातो आहे. त्यातचं ३ महिने हंगाम सुरु असल्यामुळे प्रत्येक वेळी चाहते कबड्डीचे सामने पाहतीलच याचा भरवसा देता येत नाही. त्यामुळे प्रो-कबड्डीचा कालावधी ३ महिन्यांवरुन एक ते दीड महिन्यांवर आणावा अशी मागणीही गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर चाहत्यांकडून होताना दिसली. सध्या सहाव्या हंगामातला अंदाजे पहिला महिना संपलेला आहे. त्यामुळे उरलेल्या महिन्यात प्रो-कबड्डी आपले हक्काचे प्रेक्षक परत मिळवू शकतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.