राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मुंबई पाठोपाठ पुणे व पिंपरी-चिंचवड शहारतील करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. शिवाय करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. आज दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल ३०० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ हजार ४९३ वर पोहचली आहे. यापैकी, आत्तापर्यंत ३ हजार ५०९ जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३७१ जण करोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत करोनामुळे १११ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात आज २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी करोनाबाधित आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने, पिंपरी-चिंचवडमधील पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकूण करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ९५ वर पोहचली असून, आतापर्यंत यापैकी ३१ जणांनी करोनावर मात केली. तर, उर्वरित ६४ करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर बाब म्हणजे पिंपरी पोलीस ठाण्यात दहा कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळले आहेत.

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या हा दोनशे पेक्षा अधिक येत आहे. तसेच शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील करोना विषाणूची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात २७ पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. यात दोन पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आत्तापर्यंत करोनामुक्त झालेले ३१ जणांपैकी काही जण पुन्हा कर्तव्यावर रूजू देखील झाले आहेत.

आज दिवसभरात पिंपरी पोलीस ठाण्यात तब्बल १० पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकारी, भोसरी पोलीस ठाण्यात २ कर्मचारी, वाहतूक शाखा ५ पोलीस कर्मचारी, झोन १ मध्ये दोन तर हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत.