अपुरी शिक्षकसंख्या, पायाभूत सुविधा आवश्यक प्रमाणात नसणे अशा त्रुटी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) पश्चिम विभागीय कार्यालयाने कारवाईची शिफारस केलेली ३९ महाविद्यालये आता दिल्ली दरबारी दाखल झाली आहेत. मात्र प्रवेशाचे अर्ज भरण्याची सुरूवात झाल्यामुळे यावर्षीही या महाविद्यालयांना सहानुभूती मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्रुटी असलेल्या महाविद्यालयांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाने एआयसीटीईला दिली होती. या महाविद्यालयांची एआयसीटीईच्या विभागीय कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीदरम्यान शंकाचे निरसन करू न शकलेल्या साधारण १३० महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्याची शिफरस करण्यात आली होती. बहुतेक महाविद्यालयांची १० ते २५ टक्क्य़ांपर्यंत तर काही महाविद्यालयांची ५० टक्के प्रवेश क्षमता कमी करण्यात आली. ७ महाविद्यालयांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती. पुरेशा सुविधा नसलेल्या महाविद्यालयांना त्यांच्या काही शाखा बंद करण्याची सूचनाही देण्यात आली. राज्यातील अनेक नामवंत संस्थांच्या महाविद्यालयांचा देखील यामध्ये समावेश आहे.
कारवाईची शिफारस करण्यात आलेल्या या महाविद्यालयांनी आता दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. एआयसीटीईच्या केंद्रीय कार्यालयाकडे विभागाच्या निर्णयाला ३९ महाविद्यालयांनी आव्हान दिले असून बाकीच्या महाविद्यालयांनी मात्र आपल्या त्रुटी मान्य केल्याचे दिसत आहे. आव्हान देणाऱ्या महाविद्यालयांपैकी बहुतेक महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. विभागीय कार्यालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या महाविद्यालयांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोमवारी आणि मंगळवारी मिळणार आहे.