हवेली तालुक्यातील नांदोशी गावचे माजी सरपंच अर्जुन विठोबा घुले (वय ५९) यांच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. घुले यांचा खून पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे.
सागर सुरेश मोरे (वय २१, रा. बेनकर वस्ती, धायरीगाव), तुषार सुभाष कळाणे (वय २१, नऱ्हे रस्ता, धायरी), किरण सुरेश गायकवाड (वय २६, रा.गणेशनगर, धायरी) व जितेंद्र लक्ष्मण गुप्ते (वय २५, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदोशी गावाकडून घुले हे गुरुवारी दुपारी पुण्याकडे येत असताना धायरी येथे बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली मोटार उभी करून ते मोबाइल दुरुस्त करण्यासाठी गेले. मोटारीजवळ परत येत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करत डोक्यावर व छातीवर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये घुले गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोरांनी टाकून दिलेली शस्त्रे व पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
 घुले यांच्यावर यापूर्वी २०११ मध्ये गोळीबार झाला होता. त्यातून ते बचावले होते. घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले अप्पा आखाडे यांच्यावर घुले यांच्या नातूने २०१२ मध्ये गोळीबार केला होता. या वैमनस्यातूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा संशय होता. तपास सुरू असताना या गुन्ह्य़ातील आरोपींबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चौघांना शनिवारी सायंकाळी  अटक केली. त्यांना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्य़ातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे गोवेकर यांनी सांगितले.