लाइफलाइन संस्थेची व्यवस्थापनातून माघार

पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारण्यात आलेले मोठे करोना काळजी रुग्णालय सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजेच केवळ सात दिवसांत ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी नव्याने रुग्ण भरती के ले जात नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी मंगळवारी दिली.

करोना सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी ही माहिती दिली. राव म्हणाले, ‘सीओईपी व्यवस्थापनातून लाइफलाइन संस्थेने माघार घेतली आहे. त्याऐवजी पिंपरीतील अण्णासाहेब मगर क्रीडांगण येथे उभारलेल्या मोठय़ा करोना रुग्णालयाचे काम मेडब्रो आणि डॉ. भाकरे यांच्या संस्थांकडून पाहिले जात आहे. ससूनमधील अनुभवी डॉक्टरांनी सकाळी आणि सायंकाळी सीओईपी येथील रुग्णालयाला भेट देण्याबाबत सूचना के ल्या आहेत. तसेच ससूनच्या अधिष्ठाता यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून सीओईपी येथे वैद्यकीय उपचार कसे सुरू आहेत?  हे पाहिले जाईल. तसेच ऑनलाइन माध्यमातून खासगी डॉक्टर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी बोलू शकतील, तसेच वेळ पडल्यास उपचारांबाबत मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’

सीओईपीमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांच्या उपचारांची माहिती देण्यात येत आहे. तसेच दृकश्राव्य सुविधा टॅबद्वारे महापालिके ने उपलब्ध के ली आहे, असेही राव यांनी सांगितले. महापालिका आयुक्त विक्रम कु मार म्हणाले, ‘सीओईपी येथे सध्या २२५ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी नव्याने रुग्ण भरती करण्यात येत नाहीत. या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर नेमण्यासाठी संस्थांची चाचपणी करण्यात येत आहे. जेवढे रुग्ण भरती के ले जातील, तेवढय़ा प्रमाणात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.’

पत्रकार रायकर मृत्यूप्रकरणी आज अहवाल

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा सीओईपी रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. याबाबत ससूनचे अधिष्ठाता यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या लाइफलाइन संस्थेचे संचालक सुजित पाटकर हे मुंबईत असून त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब झाला आहे. हा अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत महापालिके ला प्राप्त होईल, असेही महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी सांगितले.