जुलै २०२१ पर्यंत पूर्ण उभारणी करण्याचे नियोजन

पुणे : मेट्रोच्या कोथरूड येथील डेपोचे साठ टक्के काम पूर्ण झाले असून जुलै २०२१ पर्यंत डेपोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वनाज ते गरवारे कॉलेज हा पाच किलोमीटर लांबीचा मार्ग जानेवारी २०२० पर्यंत सुरू करण्यात येणार असून त्या दृष्टीने आवश्यक देखभाल दुरुस्ती यंत्रणा उभारणीचे काम पुढील तीन महिन्यांत करण्यात येणार आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी कोथरूड आणि रेंजहिल या ठिकाणी डेपोंची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय हा मार्ग प्राधान्याने सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग पाच किलोमीटर लांबीचा आहे. त्या दृष्टीने कोथरूड येथील डेपोही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. मेट्रोच्या डब्यांसाठी (कोच) देखभाल दुरुस्तीची यंत्रणा आणि कार्यशाळेसाठी डेपोमध्ये सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गासाठी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरील १३.२ हेक्टर जागेत डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कृषी महाविद्यालयाजवळील डेपोमध्ये कार्यशाळा आणि अन्य इमारतीच्या बांधकामांची तयारी सुरू आहे. या डेपोमध्ये डब्यांची स्वच्छता, दुरुस्ती यासाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहेत.

या दोन्ही डेपोच्या परिसरात दोन मॉल आणि बहुमजली व्यावसायिक इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून त्याची उभारणी करण्यात येणार असून मेट्रोच्या प्रवाशांसाठी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी वाहनतळही बांधण्यात येणार आहे.