पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. या आजाराचा सर्वाधिक धोका लहान मूल आणि वृद्ध व्यक्तींना असतो. मात्र, अवघ्या १२ दिवसाचं एक नवजात बाळ करोनाशी चिवट झुंज देण्यात यशस्वी ठरलं आहे. त्याची आई देखील करोनामुक्त झाली आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक होत आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील करोनामुक्त महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी महिलेला ताप आणि खोकला येत होता. बाळ सोबत असल्याने त्याची देखील श्वास घेण्याची गती वाढली होती. म्हणून बाळ आणि आईला महापालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. करोना संशयीत म्हणून तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची करोनाची चाचणी केली. यामध्ये दोघेही पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले तर आईवर देखील तातडीने उपचार सुरू करण्यात आले. बाळाची श्वास घेण्याची गती अधिक झाली होती आणि ते धापा टाकत होते. त्यामुळे त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले.

डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. उपचार काही तास सुरू होते. बाळाने हळू हळू उपचाराला प्रतिसाद दिला, अखेर ४८ तासानंतर बाळ पूर्वस्थितीमध्ये आले. त्यानंतर पुढील दहा दिवसांत या मायलेकराची करोनाची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे या दोघांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, डॉक्टरांच्या टीमने या नवजात बाळासाठी बेबी कीट देत आशीर्वाद दिले. यशवंतराव स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. दीपाली अंबिके आणि स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. महेश असलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली.