आमची लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्याविरोधात नसून भ्रष्टाचार आणि महागाई यांच्याविरोधात आहे. त्यामुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास ‘आप’चे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सोमवारी व्यक्त केला. सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा टेकू घ्यावा लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे सारसबाग येथील विपश्यना केंद्र येथील सात दिवसांचे शिबिर संपल्यानंतर केजरीवाल यांनी मौन सोडले. दिल्ली विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असतानाही मी सात दिवस येथे आलो. माझ्या जीवनामध्ये विपश्यनेचे काय स्थान आहे हे त्यावरूनच ध्यानात येते. आतापर्यंत विपश्यनेचे २२ कोर्स पूर्ण केले असून राजकारणातून दूर झाल्यानंतर शंभर टक्के विपश्यनेच्या कार्याला वाहून घेईन, असेही केजरीवाल यांनी सांगितले. योगगुरू डॉ. दत्ता कोहिनकर या वेळी उपस्थित होते.
दिल्लीमध्ये ४९ दिवसांत केलेले काम जतनेच्या स्मरणात आहे. मोफत पाणी, कमी केलेले वीजदर, संपुष्टात आणलेली लाचखोरी आणि महागाई कमी करण्यामध्ये आलेले यश ही आप सरकारची जमेची बाजू आहे. हेच मुद्दे आम्ही घेऊन जाणार आहोत. युवकांसाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी, दिल्ली शहराला ‘वाय-फाय’ करण्याचा प्रकल्प, महिला सुरक्षेला प्राधान्य हे मुद्दे असलेली विकासाची ब्लू प्रिंट लवकरच प्रकाशित केली जाणार आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. सत्ता नसल्यामुळे काही लोक पक्ष सोडून गेले असले, तरी ३० हजार नवे युवा कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.