दिल्लीतील निर्भया प्रकरणी बीबीसीने तयार केलेल्या वृत्तपटात आरोपीची मुलाखत घेण्याचा प्रकार गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचा, तसेच माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार आहे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कलामंचच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांचा अॅड. निकम यांच्या हस्ते ‘कृतार्थ जीवन’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दोन लाख रूपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, संयोजक अमित गावडे, शर्मिला महाजन आदी उपस्थित होते.
अॅड. निकम म्हणाले, निर्भयाप्रकरणात बीबीसीने तयार केलेल्या वृत्तपटात आरोपीची मुलाखत घेतली. त्यासाठी परवानगी कशी दिली जाते? परवानगी देणारे इंग्रजांच्या काळातील नियम, कायदे बदलले पाहिजेत. वेळप्रसंगी तसे लोकप्रतिनिधींनीही सांगितले पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या विरोधात जाणारे, गुन्हेगारांचे असे उदात्तीकरण थांबले पाहिजे. गुन्हेगारांना गुन्हा करताना कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. डॉ. आमटे यांचे कर्तृत्व असामान्य आहे. समाजापुढे आदर्श निर्माण करणारी बाबा आमटे, प्रकाश, मंदा आमटे अशी माणसे दुर्मिळ आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. वैद्यकीय उपचार मांत्रिकांकडून करायचे, अशी समजूत असलेल्या भागात रूग्णसेवा हा धर्म मानून आमटे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. वाट चुकलेले अनेक जण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात, त्यांना योग्य मार्ग दाखवल्यास नक्षलवादाची समस्या संपेल
इच्छाशक्ती असल्यास संवाद साधू – डॉ. आमटे
वाट चुकलेल्या नक्षलवाद्यांसाठी काही कराल का, असा प्रश्न डॉ. प्रकाश आमटे यांना मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा, ‘‘कोणतेही राजकारण न आणता सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास नक्षलवाद्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधू,’’ असे ते म्हणाले.