शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा आणि भविष्याचा विचार करता दिवाळीनंतर पुणे शहराला एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

पुणे शहराला १३५० एमएलडी पाण्यावरून कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ११५० एमएलडी देण्याचे मंजूर केले आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी आता दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रश्नावर भविष्यात पुण्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित मानले जात असून विरोधक सताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची दाट शक्यता आहे.