येळ्ळूर येथील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारने केलेल्या हल्ल्याचा पुण्यातील साहित्यिक आणि कलावंत १३ ऑगस्ट रोजी बेळगाव येथे जाऊन निषेध करणार आहेत. संचारबंदी लागू असल्याने तेथपर्यत पोहोचण्यात अडचण आली तर कोल्हापूर येथे कर्नाटक सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम होईल. बेळगाव-कारवार सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सीमा भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार आहे.
संवाद, पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रंगकर्मी योगेश सोमण आणि ‘पायलवृंद’ संस्थेच्या निकिता मोघे या वेळी उपस्थित होत्या. साहित्य, नाटय़, चित्रपट क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी बेळगाव येथे जाणार असून तेथे कर्नाटक सरकारच्या दडपशाही वृत्तीचा निषेध करण्यात येईल. डॉ. माधवी वैद्य, प्रकाश पायगुडे, दीपक करंजीकर, मेघराज राजेभोसले, सुरेश देशमुख, भाग्यश्री देसाई, अविनाश देशमुख, बंडा जोशी, अरुण जाखडे, मकरंद टिल्लू, समीर हंपी, अनिल कुलकर्णी, सत्यजित धांडेकर हे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बेळगाव येथील साहित्य आणि नाटय़ परिषदेच्या शाखेचे अशोक याळगी, मंगेश देगुलकर, अनंत जागवे, वीणा लोकूर, नीना जठार या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील साहित्य, कला क्षेत्रातून पुढाकार घेण्यात आला आहे. सीमा भागातील मराठी भाषकांवरील अन्यायासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मराठी भाषकांवरील अन्याय त्वरित दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.