भारत देशामध्ये आजही ग्रामीण भागातील ८२ टक्के महिला, मुली, युवती मासिकपाळीच्या कालावधीत ‘सॅनिटरी नॅपकिन, पॅड’ वापरत नसल्याची खंत सिने अभिनेता अक्षयकुमार यांनी व्यक्त केली.

‘कोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ अंतिम स्पर्धेचा प्रारंभ अक्षयकुमार यांच्या हस्ते झाला.  या वेळी ते बोलत होते. या वेळी महिला पोलिस, महाविद्यालयीन युवतींशी त्यांच्या संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्ह पोलिसप्रमुख विजय पवार, पोनि पद्माकर घनवट उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्षयकुमार यांनी मराठीतून सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. भाषणबाजीला फाटा देऊन महिला पोलिस व युवतींना माईक देऊन थेट प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. चित्रपटामध्ये नायकांनाच का प्रमुख भूमिका दिली जाते? सामाजिक चित्रपटात काम करताना कसे वाटते? खेडय़ातील महिलांना ‘पॅड’ विषयी माहिती नसल्याने काय केले पाहिजे? महिला सुरक्षेसाठी काय सांगाल? असे विविध प्रश्न विचारण्यात आले.

उत्तर देताना अक्षयकुमार म्हणाले, की चित्रपटामध्ये नायिकांनाही मुख्य भूमिका दिली जाते. तसे अनेक चित्रपट झालेले आहेत. तुम्हाला तसे वाटत नसेल तर मी माझ्या ‘प्रोडक्शन’च्या माध्यमातून नक्कीच नायिकांना मुख्य भूमिका देईन. यावेळी प्रश्न विचारलेल्या मुलीला ‘तुलाच मुख्य भूमिका देतो, तुम्ही या आणि भेटा’ असे सांगून त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.

दरम्यान, शहरातील महिलांच्या तुलनेत खेडय़ातील महिलांना ‘पॅड’विषयी माहिती नसते. आजही ग्रामीण भागातील ८२ टक्के महिला ‘पॅड’ वापरत नसल्याचे वास्तव आहे. ‘पॅड’ न वापरल्यामुळे ‘कॅन्सर’चे प्रमाणही वाढत आहे.

महिला सुरक्षित तर देश सुरक्षित हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवून घरातील प्रत्येक महिलेच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. ‘पॅडमॅन’ हा माझ्यासाठी चित्रपट नसून ती एक चळवळ आहे, यामुळे सर्वानी या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.