बडोदा बँकेतील शाखा व्यवस्थापकासह सोळा जणांवर ठपका

बँक ऑफ बडोदाच्या पिंपळे सौदागर शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी शाखा व्यवस्थापकासह सोळाजणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी आरोपपत्र दाखल केले.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

शाखा व्यवस्थापक तानाजी श्रीरंग बोरकर (वय ६१, रा. मोहननगर, चिंचवड), मुंगीप्पा स्टील कार्पोरेशनचा मालक राजेश शामजी पनघळ (वय ३५, रा. पिंपरी), लेखापाल राहुल दामोदर घुले (वय ३३, रा. आंबेठाण रोड, चाकण), पर्यवेक्षक कुणाल मोहनराज दास (वय २५, उद्यमनगर, पिंपरी), अनिल बलराम यादव (वय २५, इंद्रायणीनगर, भोसरी), धिरज घनश्याम चचलानी (रा. डायमंड पार्क स्ट्रीट, वाकड), सोनुल एकनाथ भालेकर (वय २०, रुपीनगर, तळवडे), अमन नझीरअहमद नदाफ (वय २२, रा. रसरंग चौक, पिंपरी), सिध्देश्वर प्रकाश भांगे (वय २८, रा. जाधववाडी, चिखली), आशा महादेव सानप (वय ३३, रा. पी. के. चौक, पिंपळे सौदागर), निगडी येथील हॉटेल गोकुळचा मालक हिमांशू हरनंदन शेखर (वय ४२, रा. भागलपूर, बिहार), रिअल इस्टेट एजंट राहुल बाबुराव आहेर (वय ३०, रा. जाधववाडी, चिखली), चंदन घनश्याम चचलानी (वय ४१, रा. पिंपळे निलख), एम. के. असोसिएट्सचा भागीदार मनोज कैलास गायकवाड (वय ४२, रा. धनकवडी), पिंपरी येथील जय भारत हॅन्डलूम हाऊसचा मालक कन्हैयालाल जेठानंद नाथानी (वय ४५, रा. पिंपरी) आणि आदित्य वॉटर सप्लायर्सचा आदित्य दत्तात्रय हगवणे (रा. शिवाजी चौक, कोंढवा बुद्रुक गावठाण) यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बँकेचा शाखा व्यवस्थापक बोरकर याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७९ लाख ६९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. ३१ जानेवारी २०१५ ते २९ जून २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक यू. के. मोरे यांनी आरोपपत्र दाखल केले.