विद्याधर कुलकर्णी

ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मराठी भक्तिसंप्रदायातील  ‘भागवत पुराण’ या महत्त्वाच्या ग्रंथाची संदर्भसूची तयार करण्याचे काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये साकारत आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदूू स्टडीज’ने भागवत पुराणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून या ग्रंथाची  संदर्भ सूची करण्याची जबाबदारी शताब्दी पार केलेल्या भांडारकर संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर हे भागवत पुराणाच्या संदर्भ सूचीचे संपादक आहेत. रसिका वझे आणि अनघा कुलकर्णी या संस्कृतच्या विद्यार्थिनींचे या प्रकल्पामध्ये सहकार्य लाभत आहे. जानेवारीमध्ये संदर्भ सूचीच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून गेल्या ८० दिवसांमध्ये तीनशे नोंदी करण्याचे काम झाले आहे. पाच वर्षांमध्ये हा संदर्भ सूचीचा प्रकल्प पूर्णत्वास जाईल यादृष्टीने त्याची आखणी करण्यात आली आहे.

डॉ. बहुलकर म्हणाले, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदूू स्टडीज’मध्ये डिसेंबर २०१४ मध्ये मी अभ्यागत संशोधक म्हणून काम केले. या केंद्राने भागवत पुराणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून तो विविध संस्थांच्या सहकार्याने सिद्ध करण्याचे ठरविले. केंद्राशी झालेल्या चर्चेमध्ये भांडारकर संस्थेने भागवत पुराणाची संदर्भ सूची आणि डेटाबेस तयार करावा, अशी कल्पना पुढे आली. त्यानुसार भांडारकर संस्थेने २०१५ मध्ये केंद्राशी शैक्षणिक सहकार्याचा करार केला. इन्फोसिस फाउंडेशनने दिलेल्या आर्थिक सहकार्यातून संदर्भ सूचीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

भागवत पुराण हा महत्त्वाचा ग्रंथ असून भक्तिसंप्रदाय, भारतीय तत्त्वज्ञान , अद्वैत वेदांत, सामाजिक सलोखा, धर्म, योग अशा विविध अंगांनी या ग्रंथावर अभ्यास झालेला आहे. या प्रकल्पामध्ये भागवत पुराण हा मूळ ग्रंथ, त्याची संस्कृत टीका, भागवत पुराणाचा मराठी, हिंदूी आणि इंग्रजी भाषांमधील अनुवाद, पुराणावर आधारित गं्रथ, एकनाथी भागवत, बहिरा जातवेद या मध्ययुगीन पंडिताची ‘भैरवी’ ही टीका, भागवत पुराणाच्या अनुवादावर झालेले संशोधनपर निबंध आणि ग्रंथलेखन, विविध ज्ञानकोश, काव्यसंग्रह, कोश यामधून भागवत पुराणाविषयीची माहिती या वाङ्मयाचा समावेश आहे. पुण्यातील विविध संस्था आणि ग्रथालयांतून प्रत्येक संदर्भ प्रत्यक्ष पाहिला जाणार आहे.

बंगळुरू, चेन्नईजवळील अडय़ार लायब्ररी, अहमदाबाद येथील बी. एन. इन्स्टिटय़ूटने साकारलेली भागवत पुराणाची चिकित्सक आवृत्ती या गोष्टींचा प्रकल्पामध्ये समावेश आहे.

अशी असेल संदर्भसूची आणि डेटाबेस

* महाराष्ट्रातील भागवत परंपरा

* भागवत पुराणाच्या पठण आणि प्रवचन परंपरेचे दृक-श्राव्य चित्रण

* आंतरजालावरील संकेतस्थळे

* नृत्य, सण-उत्सवांचा संदर्भ

* भागवत पुराणावर आधारित  रंगमंचीय आविष्काराचे चित्रण

भागवत पुराणातील गजेंद्रमोक्ष कथेवर आधारित राजस्थानी शैलीतील साहबदीन या चित्रकाराने चितारलेले चित्र.