अभिजात गायकीच्या गंधर्व सुरांशी गप्पा मारण्याची संधी शुक्रवारी (३ जुलै) लाभणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे सहभागी होत आहेत. सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद रंगणार आहे.

विद्यार्थीदशेतच आपल्या मधुर स्वरांनी रंगमंच गाजविलेल्या आनंद भाटे यांना त्या वेळी ‘आनंद गंधर्व’ ही उपाधी मिळाली होती. त्या ओळखीला स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेल्या घराणेदार तालमीने पैलू पाडले. आनंद भाटे यांच्या स्वरांतून अभिजात संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतातील विविध प्रकार, भजन, अभंग, नाटय़पदे असे विविध रंग रसिकांनी अनुभवले आहेत. संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरील चरित्रपटामध्ये बालगंधर्व यांच्या नाटय़पदांना आनंद भाटे यांचा स्वर लाभला होता. उत्तम गायनाबरोबरच संगीत नाटकांतून त्यांनी अभिनयातून रसिकांना आनंद दिला आहे.

सहभागासाठी..

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_3July 

लिंकवर जाऊन नोंदणी करा. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.