लोकसभेच्या मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या एक हजाराहून अधिक नागरिकांनी लेखी तक्रार नोंदवली असून या सर्वानी नाव वगळले गेल्यासंबंधीची प्रक्रिया व अन्य आवश्यक माहिती मिळावी, असे अर्ज माहिती अधिकाराचा वापर करून जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केले आहेत.
ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली, अशा नागरिकांचे तक्रार अर्ज भरून घेण्याचे व अर्ज संकलित करण्याचे काम अंकुर प्रतिष्ठानतर्फे केले जात आहे. गेले तीन दिवस चाललेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नावे वगळली गेलेल्या एक हजाराहून अधिक नागरिकांचे अर्ज प्रतिष्ठानकडे आले आहेत. या तक्रार अर्जाबरोबरच आवश्यक माहिती मिळण्यासाठी माहिती अधिकाराचाही वापर हे सर्व नागरिक करणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांनी सांगितले.
अर्जामध्ये आलेल्या माहितीच्या आधारे तक्रारींची वर्गवारी केली जाणार आहे व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. माहिती अधिकारात माहिती मागवण्याबरोबरच ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणूक आयोगाला नोटीस देण्याचीही प्रक्रिया केली जात असल्याची माहिती अॅड. मीताली सावळेकर यांनी दिली. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती कायमस्वरुपी उपाययोजना करता येईल, याबाबतही प्रतिष्ठान प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.