आपटे रस्त्यावरील धनराज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ऐवज लंपास केला. सोसायटीत मोटारीतून आलेल्या चोरटय़ांनी घरफोडी केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि रखवालदार तैनात असताना चोरटय़ांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कौशिक पटेल (वय ५२, रा. धनराज सोसायटी, आपटे रस्ता, मूळ रा. आनंद, गुजरात) यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पटेल आणि त्यांची पत्नी गुजरातमध्ये वास्तव्यास आहेत. तेथे त्यांचे वसतिगृह आहे. पटेल यांची दोन्ही मुले परदेशात स्थायिक आहेत. ते वर्षांतून एक ते दोन वेळा पुण्यात येतात. सदनिकेची सफाई करण्यासाठी त्यांनी एका महिलेला कामाला ठेवले आहे.
चोरटय़ांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड असा एक लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. बुधवारी (२० जानेवारी) त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा होता. पटेल हे पुण्यात आल्याचे सोसायटीतील रहिवाशांना वाटले. त्यांनी पटेल यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याचे समजले. शुक्रवारी (२२ जानेवारी) पटेल हे पुण्यात आले. त्यांनी सदनिकेची पाहणी करून पोलिसांकडे तक्रार दिली. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि रखवालदार आहेत. चोरटे बुधवारी पहाटे मोटारीतून सोसायटीत शिरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.