सिंगापूर येथील धनंजय केळकर या अनिवासी भारतीय चित्रकाराचे ‘आर्ट ऑफ गिव्हिंग’ हे चित्रप्रदर्शन शनिवारपासून (२२ नोव्हेंबर) दोन दिवस पुणेकरांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोकबिरादरी’ आणि आनंद कपूर व कुसुम कर्णिक यांच्या ‘शाश्वत’ या संस्थांना देण्यात येणार असून कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा मिलाफ कलाप्रेमी रसिकांना अनुभवता येणार आहे.
घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे शनिवारी लोकबिरादरी संस्थेचे डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे आणि शाश्वत संस्थेच्या कुसुम कर्णिक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव या वेळी उपस्थित राहणार आहेत. शनिवार आणि रविवार (२३ नोव्हेंबर) असे दोन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, अशी माहिती मोहिनी केळकर यांनी दिली.
खरगपूर येथून नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पदवी संपादन केलेल्या धनंजय केळकर यांचे गेली ३४ वर्षे वास्तव्य बहारीन, इंग्लंड आणि सिंगापूर येथे आहे. देशाबाहेर राहत असतानाही त्यांचे लोकबिरादरी, आनंदवन, शाश्वत, निर्मिती, आशा आणि युथ फाउंडेशन या संस्थांशी घनिष्ठ संबंध आहेत. वडील मधुसूदन केळकर यांच्याकडून मिळालेला चित्रकलेचा वारसा त्यांनी जोपासला आहे. या प्रदर्शनात धनंजय केळकर यांनी जलरंग आणि तैलरंगामध्ये चितारलेल्या ३० चित्रांचा समावेश आहे. देश-विदेशातील सौंदर्यातून उमटलेली चित्रे, केरळ येथील बॅकवॉटर, बनारस घाट अशा अनेक चित्रांचा यामध्ये अंतर्भाव आहे. वेगळ्या शैलीचा वापर करून त्यांनी तैलरंगात केलेली पोलोरायडर, बलेरीना, ऑटमवूड्स ही चित्रे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरतील. या चित्रांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न सामाजिक संस्थांना देण्याचा त्यांचा मानस आहे.
नुकतीच दिवाळीची धामधूम संपली आहे. रंगरंगोटी करून लखलखीत केलेल्या भिंतीवर छानशा चित्राने सजविण्याची संधी आली आहे. कलेचा आनंद घ्यायचा, आपल्या घराचं सौंदर्य खुलवायचा आणि सामाजिक बांधिलकीची जबाबदारी उचलण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने चालून आली असल्याचे आवाहन मोहिनी केळकर यांनी केले.
पहिले आणि अखेरचे छायाचित्र
धनंजय केळकर आणि शाश्वत संस्थेचे आनंद कपूर हे दोघेही आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी. संस्थेची चौकशी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. केळकर दांपत्याने मंचर येथे भेट देऊन संस्थेच्या कामाची पाहणी केली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने केळकर यांनी आनंद कपूर आणि कुसुम कर्णिक या दांपत्याच्या एकत्रित छायाचित्राची मागणी केली. मात्र, त्यांचे छायाचित्र काढण्यातच आलेले नव्हते. अखेर त्यांचे छायाचित्र काढण्यात आले. या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका प्रकाशित झाली. मात्र, आनंद कपूर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे हे या दांपत्याचे पहिले आणि अखेरचेच छायाचित्र ठरले, असेही मोहिनी केळकर यांनी सांगितले.