ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांची अपेक्षा

कलाकाराला भवतालाचे भय वाटणार नाही, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. ती जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. त्यामध्ये राज्यकर्त्यांकडून कसूर होत असेल तर, कलाकाराने त्याच्या हाती असलेल्या कलेच्या माध्यमातून त्याला वाटणाऱ्या भयाबद्दल आणि भयाच्या कारणांबद्दल बोलले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नाटय़समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते आळेकर यांना यंदाचा तन्वीर सन्मान, तर मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना नाटय़धर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, सचिव दीपा श्रीराम, ज्येष्ठ कला अभ्यासक अरुण खोपकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या वेळी उपस्थित होत्या. फैजे जलाली यांनी ‘शिखंडी- द स्टोरी ऑफ इन बिटविन्स’ या गाजलेल्या नाटकातील काही अंश अभिनयासह सादर केला.

नाटकांबद्दल नाही, तर समाजातील स्थितीबद्दल भय वाटण्याजोगी स्थिती आहे, याकडे लक्ष वेधून आळेकर म्हणाले,की बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचा सध्या रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. बाबरी मशीद पडली त्या दिवशी ६ डिसेंबर रोजी कोलकता येथे ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग सुरू होता. देशाच्या फाळणीचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना १२ डिसेंबर १९७२ रोजी ‘घाशीराम’चा पहिला प्रयोग झाला होता. आता उदारीकरणाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. आपण नाटकं केवळ करमणुकीसाठी पाहतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करायला ‘घाशीराम’ आणि ‘सखाराम’ होता. ज्यांच्यामुळे कलाकाराला अभिव्यक्त होण्यासाठी भय वाटते त्या शक्ती पुन्हा सत्तास्थानावर आहेत. मात्र, कलाकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्याला वाटणाऱ्या भयाबद्दल आणि या भयाच्या कारणांबद्दल बोलले पाहिजे.

नाटकाचा गोतावळा मोठा असतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागचे कलाकार असे सगळेच त्या गोतावळ्यामध्ये असतात. मला प्रदान झालेला पुरस्कार हा त्या सर्वासह थिएटर अ‍ॅकॅडमी आणि ललित कला केंद्राचा असल्याची भावना व्यक्त करून आळेकर म्हणाले,‘‘नट हा लमाण’ असल्याचे डॉ. लागू यांनी म्हटले आहे. नाटकाच्या संहितारूपी पालखीचा भार उचलत असला तरी नटाला नाटक प्रेक्षक-सापेक्ष करावे लागते. त्या अर्थाने नट लमाण असल्याचे लागू यांनी म्हटले असावे.’

आळेकर यांची तिरकस विनोदबुद्धी आणि जीवनमूल्यांचा अभ्यास ‘कथा दोन गणपतरावांची’ चित्रपटाच्या संवादलेखनाच्यानिमित्ताने करता आला, असे सांगून खोपकर म्हणाले,‘ बीभत्स, भयानक आणि अद्भुत रसांचा परिपोष असलेले ‘बेगम बर्वे’ हे बांधीव नाटक युरोपियन भाषेतही दिसत नाही. धार्मिक विधीतील श्रद्धा निघून गेल्यावर कर्मकांडाचं निर्माल्य होते, हा संदेश त्यांच्या ‘महानिर्वाण’ नाटकाने दिला.’

प्रत्येक वाचनात आणि काही वर्षांनी होणाऱ्या प्रयोगांमध्ये आळेकर यांची नाटके वेगवेगळ्या आशयासह उलगडतात, असे प्रा. पुष्पा भावे यांनी सांगितले. सर्जनशील लेखक, संवेदनशील माणूस, प्रशासनातील शिक्षक अशी आळेकर यांची विविध रूपे मुक्ता बर्वे यांनी उलगडली. त्या म्हणाल्या,‘ ललित कला केंद्रात अनौपचारिक नाते कायम ठेवत त्यांनी त्या वेळी दिलेला मत्रीचा हात कायम सोबत आहे. सरांनी स्वत:चे अनुयायी घडविले नाहीत, तर आमच्यासाठी अवघे अवकाश खुले केले.’