फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका खुनाच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर उत्तर प्रदेश येथे हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतरही पुणे पोलिसांनी जीवाची बाजी लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी एक हत्येची घटना घडली होती. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक गाझियाबाद येथे गेले होते. यावेळी स्थानिक पोलीस देखील पुणे पोलिसांबोत होते. आरोपी एका गल्लीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेले असता पाच ते सहा जणांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अखेर खुनातील आरोपीला अटक करत इतर हल्लेखोरांना ताब्यात घेतले अशी माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे लांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, गाझियाबाद पोलिसांना घटनास्थळावरुन सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.