चिन्मय पाटणकर

मुंबईच्या रंगाई थिएटर कंपनी या नाटय़संस्थेच्या तीन नाटकांचे प्रयोग २६ आणि २७ जानेवारीला पुण्यात होत आहेत. प्रेक्षकांना नाटकात सामावून घेणारी ही अनोखी नाटकं आहेत.

अलीकडे नाटकाच्या सादरीकरणात दिग्दर्शक खूप प्रयोगशील विचार करू लागले आहेत. रंगमंचाच्या बाहेर पडून नाटकाचा विचार केला जाऊ लागला आहे. प्रेक्षकांना नाटकात सामावून घेणं किंवा इमर्सिव्ह थिएटर हाही असाच एक वेगळा प्रयोग. मुंबईच्या रंगाई थिएटर कंपनीच्या द प्रपोजल, द डार्क रूम आणि अनटायटल्ड या तिन्ही नाटकांमध्ये असे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. ही नाटकं पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. बाणेरच्या ड्रामालय इथं २६ जानेवारी आणि कल्याणीनगरच्या आर्टस्फिअर इथं २७ जानेवारीला हे प्रयोग रंगणार आहेत.

‘द प्रपोजल’ हे नाटक रशियन लेखक अँटन चेकव्हनं लिहिलं आहे, ‘द डार्क रूम’मध्ये मुन्शी प्रेमचंद आणि सआदत हसन मंटो यांच्या कथा आहेत. तर, ‘अनटायटल्ड’ हे सत्यघटनांवरून प्रेरित नाटक आहे. या तिन्ही नाटकांचं दिग्दर्शन तुषार दळवीनंच केलं आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीचं चित्रण या नाटकात परखडपणे आणि प्रयोगशीलतेनं करण्यात आलं आहे. इमर्सिव्ह थिएटर या प्रकारात प्रेक्षकांना नाटकात सामावून घेतलं जातं, त्यांना नाटकाचाच एक भाग मानलं जातं. त्यामुळे डोळ्यांवर पट्टी बांधणे, सुगंधांचा वापर करणे, चेहरा झाकणे असे अनेक प्रयोग प्रेक्षकांबरोबरही केले जातात. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही तो वेगळा अनुभव ठरतो. तुषार दळवी, अर्पिता घोगरदरे, धीरज अहिर, मुस्तुफैज अन्सारी, निखिल पवार, स्नेहा घोसाळ, शिवम द्विवेदी आदींच्या नाटकात भूमिका आहेत.

इमर्सिव्ह थिएटरच्या वापराविषयी तुषार म्हणाला, ‘माझा स्वतचा कल प्रयोगशीलतेकडे आहे. त्याशिवाय मी काही र्वष लंडनमध्ये शिकायला होतो. तिथं एका नाटय़संस्थेबरोबर काम करत होतो. त्या वेळी तिथली काही प्रयोगशील नाटकं पाहण्यात आली होती. अलीकडे मुंबईत छोटी नाटय़गृह (इंटिमेट थिएटर्स) तयार झाली आहेत. तिथं प्रकाशयोजनेसारख्या तांत्रिक बाजू वापरण्यात मर्यादा असतात. त्यामुळे काहीतरी वेगळा विचार करावा लागतो. त्यातूनच मला इमर्सिव्ह थिएटर हा प्रकार गवसला. सुरुवातीला तो वापरण्याविषयी साशंक होतो. मात्र काही प्रयोगांनंतर प्रेक्षकही त्याचा स्वीकार करतायत, हे आवडतंय असं जाणवलं. म्हणून अजून वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.’