लोकसभा निवडणुकीत जात, धर्म, पंथ विसरून मतदारांनी विकासाला मतदान केल्याचा अन्वयार्थ लावला जातो. पण, प्रत्यक्षातील सामाजिक व्यवहारात अस्मितांच्या भिंती उंच होत आहेत. फेसबुकच्या जमान्यातील आधुनिक युवक देवाच्या दर्शनासाठी ताटकळत थांबलेला दिसतो. स्कोडा गाडीला मिरची-िलबू लावतो. त्यामुळेच सध्याचे युवक तंत्रज्ञानाभिमुख असले तरी विज्ञानाभिमुख नाहीत, असे मत व्यक्त करीत एस. एम. जोशी फाउंडेशनचे विश्वस्त अभय जोशी यांनी वास्तवावर बोट ठेवले.
आवाबेन नवरचना संस्थेचा ४१ वा वर्धापनदिन आणि आवाबेन देशपांडे यांचा ४२ वा स्मृतिदिन असे दुहेरी औचित्य साधून अभय जोशी यांच्या हस्ते मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सचिव प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांना सुमतीबाई साठे पुरस्कार आणि तुकाराम भांड यांना भाऊसाहेब रानडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि नगरसेविका लक्ष्मी घोडके या वेळी उपस्थित होते.
समाजामध्ये रूढी आणि परंपरांचे स्तोम वाढते आहे. सध्या स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत. मात्र, मानसिकदृष्टय़ा सक्षम नाहीत असेही अभय जोशी यांनी सांगितले. रास्ता पेठ म्हटले, की आवाबेन यांच्या घरी यायचे एवढेच पूर्वी ठाऊक होते. आई शाकाहारी असल्याने घरामध्ये होत नसलेले आम्लेट आवाबेन करून द्यायच्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.
सामाजिक काम करताना ‘अजून लढ’ असे म्हणत पाठीवर मारलेली शाबासकीची थाप या अर्थाने मी हा पुरस्कार स्वीकारतो, अशी भावना प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केली. श्री. ना. देशपांडे यांच्या दवाखान्यामध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे काम होत असे. तेव्हा आवाबेन यांनी मंडळाला सर्वतोपरी सहकार्य केले. त्या काळामध्ये आंतरधर्मीय विवाह करण्याचे धाडस आवाबेन यांनी दाखविले, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या विद्यार्थिनींनी ‘तारे जमीं पर’ या गीतावर नृत्य सादर केले. ‘एसएम तुम्ही आमच्या अंतरंगी, असंख्यात ज्योती दळे लावली’ हे गीत संस्थेच्या कार्यकर्त्यां महिलांनी सादर केले. सुरेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.