अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे विशेष दालन रविवारपासून (६ मार्च) सुरू करण्यात येत असून ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
विविध प्रसारमाध्यमांमुळे वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांबाबत बरीच चर्चा घडून येते. लेखकांनी केलेल्या पुरस्कार वापसीबाबत मतमतांतरे सुरू आहेत. या चर्चेमुळे अनेक वाचक पुस्तकांच्या दुकानांमध्ये आणि ग्रंथप्रदर्शनामध्ये जाऊन या पुस्तकांचा शोध घेतात. हे ध्यानात घेऊन बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीने पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे विशेष दालन केले असून त्याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता श्याम मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. या दालनामध्ये सुमारे एक हजारहून अधिक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाचकांसाठी २२ मार्चपर्यंत खुले राहणार असून या दालनातील पुस्तकांवर वाचकांना २५ टक्के सवलतही मिळणार आहे. या निमित्ताने प्रा. मिलिंद जोशी हे श्याम मनोहर यांची मुलाखत घेणार आहेत, असे गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर यांनी कळविले आहे.