बाळाचा जन्म हा कुटुंबातल्या प्रत्येकासाठी सोहळाच, पण सगळे काही ठीक असतानाही बाळ मृत जन्माला आले तर?..पुण्यात मात्र गेल्या गेल्या चार वर्षांत मृत जन्मणाऱ्या बालकांची संख्या सातत्याने घटत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
जन्म-मृत्यू कार्यालयाने पुरवलेल्या माहितीनुसार गतवर्षी (२०१४) शहरातील सर्व रुग्णालयांत मिळून झालेल्या प्रसूतींमध्ये ९६३ बालके मृत जन्माला (स्टिल बर्थ) आली, २०११ मध्ये ही संख्या १,१९३ होती. जन्मत: मृत म्हणूनच जन्मणाऱ्या बाळांची गणना ‘स्टिल बर्थ’ म्हणून केली जाते. जन्मल्यावर बाळाने एक जरी श्वास घेतला, तरी त्याला ‘मृत जन्म’ मानले जात नाही.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. राजन जोशी म्हणाले, ‘बाळ मृत जन्माला आल्यावर बाळाचे आई-बाबा खूप खचून जातात. आपण काळजी घेण्यात कमी पडलो अशी त्यांची भावना असते. जगात सर्व ठिकाणी बालके मृत जन्माला येण्याची समस्या आहे.पूर्वी गरोदर स्त्रियांची पुरेशी काळजी घेण्याच्या सोई नव्हत्या, पण आता गरोदर स्त्री बाळंतपणासाठी आल्यावर तिची आणि होणाऱ्या बाळाची वेळोवेळी तपासणी करून लक्ष ठेवले जाते, तरीही बाळ मृत जन्माला येणे शक्य असते. बाळ आईच्या गर्भात नाळेच्या (प्लासेंटा) साहाय्याने जिवंत असते. नाळेशी संबंधित काही गुंतागुंत निर्माण झाली किंवा नाळेला वेढे बसले, तर बाळाला धोका असू शकतो.’
गरोदर स्त्रीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर त्यांची अधिक काळजी घेण्याची गरज असते. अशा स्त्रियांमध्ये काही वेळा गर्भाशयाला जोडलेल्या नाळेतील रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह कमी होण्याची आणि त्या आकुंचन पावण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाळ गर्भाशयात गुदमरु शकते, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीच्या माजी अध्यक्ष डॉ. सविता मेहेंदळे म्हणाल्या, ‘मातेचा रक्तदाब खूप जास्त असेल आणि तिला उपचार सुरू असतील, तरीही गर्भातील बाळाला नाळेवाटे मिळणारा रक्त आणि प्राणवायूचा पुरवठा कमी असू शकतो. मातेला तीव्र अॅनिमिया असल्यास बाळ गर्भाशयात कमी प्राणवायूवर राहत असते. त्यावर मातेला तांबडय़ा रक्तपेशी (पॅक्ड आरबीसी) देण्यासारखे उपाय आहेत. तीव्र मधुमेह असलेल्या गर्भवतींना त्यासाठी उपचार सुरू असले, तरी कधी-कधी बालक मृत जन्मास येण्याचा धोका असू शकतो. बाळाला नाळेवाटे होणारा रक्तपुरवठा ‘कलर डॉपलर’ तंत्राने तपासला जातो. त्यानुसार धोका असल्याचे कळल्यावर तो टाळण्यासाठी गर्भवतीची स्थिती पाहून प्रसूतीचा निर्णय घेतला जातो.’
पालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाने पुरवलेली मृत जन्मणाऱ्या बालकांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-
वर्ष        मृत जन्मलेली बालके
२०१०              ९२०
२०११             ११९३
२०१२            ११२६
२०१३            १०३१
२०१४             ९६३

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?