पिंपरी-चिंचवडला आठ दिवसांत तीन घटना

पिंपरी : मुलीचा जन्म होताच तिला मिळेल त्या ठिकाणी सोडून देण्याच्या तीन घटना पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांत घडल्या. यातील एका घटनेत तर महिलांच्या शौचालयात अर्भक टाकून देण्यात आल्याचे आढळून आले. तर, दुसऱ्या घटनेत नदीकाठी तर तिसऱ्या घटनेत मंदिराजवळपास अर्भक सोडून देण्यात आले होते.

‘मुलगी झाली, प्रगती झाली’, असे मानणारा वर्ग असतानाच मुलगी नकोशी वाटल्याने तिचा जन्म होताच तिला सोडून देणारी प्रवृत्तीही समाजात आढळून येते. उद्योगनगरीत आठ दिवसांत घडलेल्या तीन घटनेत त्याचा प्रत्यय आला. या तीनही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

एक घटना शिरगाव (मावळ) येथे ११ जूनला उघडकीस आली. साईमंदिरापासून काही अंतरावर अर्भक रस्त्यावर पडले होते. पाऊस सुरू होता आणि आजूबाजूला भटकी कुत्री वावरत होती. संतोष गोपाळे या नागरिकाने पोलीस पाटलांच्या माध्यमातून तळेगाव पोलिसांना ही माहिती कळवली. तेथून हे अर्भक ससून रुग्णालयात पाठवण्यात आले.

सोमवारी (१७ जून) देहूतील गांधीनगर येथे एका महिलांच्या शौचालयात पहाटे पाचच्या सुमारास नुकतेच जन्मलेले अर्भक मृतावस्थेत सापडले. एका महिलेने ते पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अल्पवयीन मुलीच्या अनैतिक संबंधातून ही मुलगी जन्माला आली होती, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.

मंगळवारी (१८ जून) मोशीत इंद्रायणी नदीकाठी दोन दिवसांचे अर्भक आढळून आले. येथून जाणाऱ्या एका बिहारी कामगाराने कपडय़ात गुंडाळलेले हे अर्भक पाहिले आणि त्याने ते ग्रामीण रुग्णालयात नेले. चाकण पोलिसांनी ते ताब्यात घेतले आणि ससून रुग्णालयात सुपूर्द केले.

मुलीचे अर्भक अशाप्रकारे सोडून जाणे, हे दुर्दैवी आहे. बेवारस ठिकाणी अर्भक सोडणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यात कठोर शिक्षा होऊ शकते. प्रेमप्रकरणातून, अनैतिक संबंधातून असे प्रकार घडतात. तसेच, मुलीला सांभाळू शकणार नाही, या हतबलतेतून असे प्रकार होतात.

– स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त