ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाहय कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोहत यांना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. मुनहोत यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी मुनहोत यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुनहोत यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात मुनहोत यांची चौकशी करायची आहे. काही कागदपत्रे जप्त करायची आहेत, तसेच कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यामुळे मुनहोत यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवादात केली. न्यायालयाने मुनहोत यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती सध्या येरवडा कारागहात आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात डबघाईला आलेल्या कुलकर्णी यांच्या कंपनीला शहानिशा न करता नियमबाह्य कर्ज दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. कुलकर्णी यांनी केलेल्या फसवणुकीची व्याप्ती पाहता पोलिसांनी तपासासाठी सनदी लेखापालांचे (फॉरेन्सिक ऑडीटर) विशेष पथक नेमले होते. तपासात कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे सनदी लेखापाल सुनिल घाटपांडे, उपाध्यक्ष राजीव नेवासकर यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर याप्रकरणात बँकेचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना जयपूर येथून अटक करण्यात आले. जयपूर येथून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) घेऊन त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने देशपांडे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

रवींद्र मराठे यांना रूग्णालयातून सोडले

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांनी प्रकृती अस्वस्थाबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांकडून त्यांना गुरूवारी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठे यांना ससून रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. मराठे यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.