कलाकारांच्या कलागुणांचे समाजाकडून भरभरून कौतुक केले जाते. मात्र, आपल्याला मिळणाऱ्या प्रसिध्दीचा फायदा घेऊन काही कलावंतांकडून आर्थिक हिताचा विचार केला जातो. कलेने खूप काही दिले असताना समाजाला आपणही काहीतरी दिले पाहिजे. तेथे पैसे कमवण्याचा विचार नको. कलेच्या कौतुकाचा व्यवहार होता कामा नये, असे मत अभिनेते भरत जाधवने तळवडे येथे व्यक्त केले.
रूपीनगरच्या ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांशी भरतने संवाद साधला. या वेळी शांताराम भालेकर, गोरख भालेकर, पंढरीनाथ जांभूळकर, सूर्यकांत भसे आदी उपस्थित होते. भरत म्हणाला, ‘आपण निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात अडथळे व अडचणी आल्याच पाहिजेत. त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण होत असते.’ यशाचा मार्ग सोपा नसावा. प्रचंड कष्ट, आत्मविश्वास, स्वत:मधील क्षमतेची पुरेपूर कल्पना, अपयशाने खचून न जाता पुढे जाण्याचा निर्धारच आपल्याला यशस्वी करू शकतो. आपल्याला भविष्यात काय करायचे हे ठरवणे म्हणजे अर्धे यश मिळवणे होय. मनापासून प्रयत्न केल्यास ठरवलेल्या क्षेत्रात हमखास यशस्वी होता येते. गरीब आहोत म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करण्याचे प्रयत्न करावेत.