भीमाशंकरमध्ये शेकरूंच्या घरटय़ांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत ७५९ ने वाढली आहे. या घरटय़ांवरून शेकरूंची संख्या काढली असता भीमाशंकरमध्ये सुमारे १,९८५ शेकरू खारी असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
भीमाशंकरमध्ये १५ ते २० मे दरम्यान शेकरूंच्या घरटय़ांची गणना करण्यात आली. या गणनेचा अहवाल समोर आला असून त्यानुसार या अभयारण्यात प्रति चौरस किलोमीटरमध्ये १७ शेकरू आहेत.
शेकरू खार (जायंट स्क्विरल) काटक्या, डहाळ्या आणि पाने वापरून घुमटाकार घरटी बांधते. सहसा शेकरू पाणवठय़ावर पाणी पिण्यासाठी आलेली दृष्टीस पडत नसल्याने शेकरू गणना घरटी मोजून केली जाते. प्रत्येक शेकरू आपल्या परिसरात साधारणत: सहा ते आठ घरटी बांधून ती वापरतो. प्रगणना करताना नोंदवलेल्या घरटय़ांच्या संख्येस ६ ने भागून त्या भागातली शेकरूंची अंदाजे संख्या काढली जाते. यंदा भीमाशंकरमध्ये १९ ठिकाणी शेकरूंची घरटी मोजण्यात आली. या गणनेत शेकरू वापरत असलेल्या ११,९१५ घरटय़ांची नोंद करण्यात आली आहे. या घरटय़ांवरून या ठिकाणी १,९८५ शेकरू असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. गेल्या वर्षी शेकरूंच्या ११,१५६ घरटय़ांची नोंद झाली असून ती संख्या यंदा ७५९ ने वाढली आहे.
कुठे-कुठे सापडले शेकरू?
भीमाशंकर अभयारण्यात भट्टी, कुंभारखाण, आहुपे देवराई, निगडाळे देवराई आणि चौरा टेकडी येथे शेकरूंची संख्या जास्त आढळत असल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे या ठिकाणी गणनेसाठी विशेष लक्ष देण्यात आले होते. या वर्षी साकरमाचीवाडी, घाटघर, गुप्त भीमा ते भोरगिरी, खांडस, रजपा, नांदगाव या भागातही मोठय़ा प्रमाणावर शेकरूंची घरटी दिसली.
 ‘शेकरू संवर्धनासाठी जनजागृती गरजेची’
‘शेकरू प्रामुख्याने करप, आंबा, जांभूळ आणि हिरडा या झाडांवर घरटी बांधतात. त्यामुळे अभयारण्याच्या बाहेरील परंतु लगतच्या गावांमध्ये या झाडांची तोड होऊ नये यासाठी वन्यजीव विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम राबवला जाईल. गणनेत आढळलेली शेकरूंची संख्या पाहता शेकरू संवर्धनाविषयीच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. ग्राम परिसर विकास समितीमार्फत स्थानिकांमध्ये याबद्दल जनजागृती केली जात आहे.’
सुनील लिमये, मुख्य वन्यजीवसंरक्षक (वन्यजीव)