भाजपच्या अधिकृत व राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने भोसरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या कु. श्रध्दा लांडे व शिवसेनेच्या सारिका कोतवाल यांचे अर्ज राहिले असून त्यांच्यात थेट लढत होणार आहे. माघारीच्या शेवटच्या पाच मिनिटांत झालेल्या नाटय़मय घडामोडीत राष्ट्रवादीने खेळलेल्या खेळीमुळे कोतवाल यांनी माघारीचा निर्णय जवळपास घेतला होता. मात्र, युतीच्या नेत्यांनी सतर्कता दाखवल्याने बिनविरोध निवडणूक टळली.
ही पोटनिवडणूक ७ जुलैला होणार आहे. शुक्रवारी माघारीचा दिवस होता. राष्ट्रवादीकडून लांडे, भाजपकडून मीना सोनवलकर, शिवसेनेकडून कोतवाल व राष्ट्रवादीच्या बंडखोर सुजाता लोंढे असे चौघांचे अर्ज होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक वसंत लोंढे यांच्याशी चर्चा केली. अजितदादांच्या सूचनेनुसार सुजाता लोंढे यांनी माघार घेतली. महायुतीतील नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजपच्या सोनवलकर यांचा अर्ज मागे घेण्यात आला. कोतवालांच्या अर्जावरून बऱ्याच घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे तसेच बाजीराव लांडे यांनी वेगवेगळ्या मार्गाने दबावतंत्र वापरून कोतवाल यांना एकटे पाडले. तेव्हा कोतवालांनी माघार घेण्याची मानसिकता केली होती. त्याची कुणकुण युतीच्या नेत्यांना लागली. त्यांनी दाखवलेल्या सावधपणामुळे माघार टळली.
दरम्यान, मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी (८ जुलै) मतमोजणी होणार आहे. भोसरीतील वातावरण पाहून मतमोजणी पालिका मुख्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल व तासाभरात निकाल हाती लागेल, असे सांगण्यात आले.