पुणे विद्यापीठाच्या अनेक विभागांमध्ये गेले अनेक महिने नावापुरतीच असलेली बायोमेट्रिक हजेरीची प्रणाली अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून १ नोव्हेंबरपासून ही प्रणाली पुन्हा कार्यान्वित होत असल्याची सूचना विद्यापीठाने दिली आहे.
पुणे विद्यापीठामध्ये सर्व विभागांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली होती. प्रत्येक विभागामध्ये बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणारे यंत्रही विद्यापीठाने बसवले. मात्र, ही प्रणाली नेहमी बंद असल्यामुळे चर्चेत होती. अनेक विभागांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवूनही विभागांकडून त्याचा वापर केला जात नव्हता. मात्र, आता सर्व विभागांनी १ नोव्हेंबरपासून या प्रणालीचा वापर करावा अशी तंबीच विद्यापीठाने दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे विद्यापीठामध्ये सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित नव्हती. मात्र, आता त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून बायोमेट्रिक पद्धतीनेच उपस्थितीची नोंद केली जाणार आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.