करोनामुळे राज्यात रुग्णसंख्येत वाढ झाली असून, दुसरीकडे पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, नाम फाउंडेशन यांच्यासह अन्य ग्रुपने एकत्रित येत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात नाम फाउंडेशनचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. “रक्ताचाही काळाबाजार केला जातोय, असं म्हणत नानांनी खंत व्यक्त केली.

रक्तदान शिबिरात बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “काही गलिच्छ डॉक्टर मंडळींनी पेशाला काळिमा फासला आहे. रक्ताचा काळाबाजार होत असून, आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीला सांगितले, तर ते लगेच ऐकतात, पण दुसर्‍या बाजूला काही मंडळी त्यांना दूषणं देत असतात. या पिढीला काही कळत नाही. ते कसंही वागतात. माझं अशा व्यक्तींच्याविरुद्ध मतं असून, आजच्या एवढी तरुण पिढी कोणतीच सजग नव्हती,” अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना नाना म्हणाले, “वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता आपण देशभरात सर्व विद्यापीठात रक्तदान शिबिरांचं आयोजन करीत आहोत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज पुण्यात शिबिराचं आयोजन केलं आहे. ही चांगली गोष्ट असून यात तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे. अधिकाधिक तरुणांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे,” असं आवाहन नाना पाटेकर यांनी यावेळी केलं.