गैरव्यवहाराच्या विविध प्रकरणांत दोषी असलेले व त्यामुळे वेळोवेळी निलंबनाची कारवाई झालेले पालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश वामनराव शेलार (वय ४५)यांच्यासह त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्ता जमविल्याच्या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय पालिकेच्या पथ विभागाचे उपअभियंता मुश्ताक महंमद शेख (वय ५१) व त्यांच्या पत्नीवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार शेलार यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. १६ सप्टेंबर १९९५ ते ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत त्यांना ज्ञात स्रोतापासून १ कोटी ४५ लाख ६० हजार ३९६ रुपये उत्पन्न मिळाले. त्याच्यातून त्यांचा व कुटुंबीयांचा खर्च वजा करता त्यांच्याकडे एकूण ६ लाख ५५ हजार ५७२ रुपये इतकी संभाव्य शिल्लक राहत असल्याचे दिसून आले. मात्र, वरील कालावधीत शेलार यांनी आणखी ५६ लाख ८३ हजार २०५ रुपयांची मालमत्ता संपादित केली आहे. ज्ञान स्रोतातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून ही मालमत्ता ते संपादित करू शकत नसल्याचे सिद्ध झाल्याने शेलार यांनी ६६ लाख ३८ हजार ७७८ रुपयांची अपसंपदा जमविल्याचे उघड झाले. त्यासाठी त्यांची पत्नी शारदा यांनीही मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांवरही दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुश्ताक शेख यांना महापालिका कार्यालयात सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर घरझडतीची कारवाई करण्यात आली. त्यात निष्पन्न झालेल्या मालमत्तेवरून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश आले. त्यानुसार त्यांच्या संपूर्ण उत्पन्नाची व मालमत्तेची चौकशी करण्यात आली. त्यांनी १ जानेवारी १९८६ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत ३९ लाख ७१ हजार रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे उघड झाले. त्यासाठी त्यांच्या पत्नी अफरोज यांनीही मदत केल्याने दोघांवरही येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडून परवानगी घेतल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध रितसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयास ०२०-२६१२२१३४, ०२०-२६१३२८०२ या क्रमांकावर किंवा ९४२०९०१९०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी केले आहे.