प्रवाशांसाठी अत्यंक गैरसोयीचे ठरणारे स्टीलचे बसथांबे उभारण्याचे जे काम पीएमपीतर्फे शहरात सुरू आहे ते सदोष असल्याचे स्पष्ट झाले असून महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर आता या थांब्यांची दुरुस्ती पीएमपीतर्फे सुरू करण्यात आली आहे.
 लाखो रुपये खर्च करून शहरात पीएमपीतर्फे बसथांबे उभे केले जात असले, तरी या बिनकामाच्या बसथांब्यांचा खरा लाभ कोणाला होणार आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. त्यासंबंधी ‘या बसथांब्यांचं करायचं काय’ हे वृत्त ‘लोकसत्ता’च्या ‘पुणे वृत्तान्त’मध्ये १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. महापौर चंचला कोद्रे यांनीही हे थांबे प्रवाशांसाठी गैरसोयीचे असून त्यांची रचना बदलावी असे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले होते. विशेषत: थांब्यांच्या छताची रचना सदोष असून त्यांची दुरुस्ती करावी, असेही महापौरांनी सांगितले होते. पीएमपीच्या प्रवाशांनीही महापौरांकडे तक्रारी केल्या होत्या.
महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार सध्या जे स्टीलचे बस थांबे बसवले जात आहेत त्यांची दुरुस्ती पीएमपी प्रशासनाने सुरू केली असून थांब्यांचे छत पुढील बाजूच्या रेलिंगपर्यंत एक फुटाने वाढवण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही अंमलबजावणी तातडीने करावी, असा आदेशही पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांनी दिला आहे.
पीएमपीचे हे थांबे खासदार आणि आमदारांनी दिलेल्या निधीतून उभारले जात असून असे दीडशे थांबे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांना गैरसोयीचे ठरणारे थांबे या निधीतून उभारले जात होते. बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांचा विचार न करता हे थांबे उभारण्यात आल्याचे आता दुरुस्तीकामे सुरू झाल्यामुळे स्पष्ट झाले आहे.