खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

राज्यातील मराठी माध्यमांच्या तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्य शासन जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. शाळा बंद झाल्यास मुली शिक्षण घेऊ शकतील का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे उपस्थित केला. शाळा बंदचा निर्णय झाल्यास तो दिवस काळा दिवस ठरेल, अशी टीका करतानाच राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर मार्ग निघत नाही तोपर्यंत तालुका-तालुक्यात मौन आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले अशा राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या स्मारकांच्या उभारणीला होत असलेला विलंब, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय, विद्यर्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्त्या, शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीचा घोळ याच्या निषेधार्थ लाल महालात  बहुजन अस्मिता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.  ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार उल्हास पवार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, पी. ए. इनामदार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकु श काकडे, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास पासलकर या वेळी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, की मराठी माध्यमाच्या शाळा सरकार बंद करत आहे. दुसरीकडे जाहिरातींसाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. बेटी बचाव—बेटी पढावच्या घोषणा सरकार करत आहे. थोर व्यक्तींच्या स्मारकांबाबत केवळ घोषणा केल्या जात आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यातून सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर उभा देश हादरला होता. त्यानंतर निर्भया योजनेसाठी सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी अवघे सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. मनोधैर्य योजनाच सरकारने बंद केली आहे. त्यामुळे महिलांच्या छेडछाडीच्या घटना सर्रास सुरू आहेत.

भाजप सरकार हे घोषणाबाज असून अच्छे दिनाच्या केवळ वल्गना आहेत, अशी टीका भाई वैद्य यांनी व्यक्त केली. बहुजनांनी इतिहासात न रमता आधुनिकतेची कास धरावी, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले.