धर्माच्या नावाने मते मागणे बेकायदा असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे देशाची एकता टिकणार आहे. तसेच हक्क सुरक्षित झाला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पिंपरी चिंचवड मध्ये बोलताना व्यक्त केले. धर्म जातीच्या आधारावर मतपेढ्या काबीज करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जोरदार धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर फेरीवाला विजय मेळावा या कार्यक्रमात मेधा पाटकर बोलत होत्या. नोटाबंदीचे नाट्य हे जमिनीकडे पैसा वळण्यासाठीचे नाटक आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला.

नेत्यांना धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर मत मागता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. हिंदूत्वच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या विविध याचिकांवर ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रीया असते आणि त्याचे पालन केलेच पाहिजे असेही कोर्टाने म्हटले आहे. हिंदूत्वप्रकरणी सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर सोमवारी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. देव आणि मनुष्य यांच्यातील संबंध हे वैयक्तिक आवडीचा भाग आहे. यात कोणीही अडथळा आणू शकत नाही असे कोर्टाने नमूद केले. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १२३ (३) ची व्याप्तीही वाढवली. आगामी काळात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा यासारख्या राज्यांसोबतच मुंबई आणि ठाण्यात महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर कोर्टाने दिलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. विशेष म्हणजे देशाच्या राजकारणात नेहमीच भाषा, जात, धर्म यांना महत्त्व आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने यावर प्रतिबंध बसेल अशी आशा आहे.