वार्षिक कर भरणाऱ्या परिवहन संवर्गातील सर्व प्रकारच्या वाहनांना करोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सरसकट करमाफी देण्याबाबतचे नवे आदेश अखेर शासनाने काढले आहेत. या कालावधीतील कराचा भरणा केला असल्यास तो कर पुढील सहा महिन्यांसाठी समायोजित करण्यात येणार असल्याचेही या आदेशातून स्पष्ट झाले आहे. याबाबत पूर्वी काढण्यात आलेल्या तीन आदेशांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्याने करमाफीतून अनेक वाहतूकदार वंचित राहण्याची शक्यता होती.

‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय मांडला होता. टाळेबंदीनंतर व्यावसायिक वाहने बंद असल्याने कराचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित करून करमाफीबाबत वाहतूकदारांनी मागणी केली होती. त्यानुसार सप्टेंबरमध्ये करमाफीचा निर्णय झाला. वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांसाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीसाठी करमाफी जाहीर केली होती. मात्र, या कालावधीतील वार्षिक कर भरलेल्या सर्वच वाहतूकदारांच्या कराचे समायोजनासह विविध बाबींची स्पष्टता होत नव्हती. त्यामुळे अनेक वाहतूकदार करमाफीपासून वंचित राहात असल्याचा मुद्दा राज्य माल आणि प्रवासी वाहतूकदार प्रतिनिधी महासंघाकडून उपस्थित केला जात होता. दरम्यानच्या काळात करमाफीच्या  सहा महिन्याच्या कालावधीतील कर थकीत दाखवून त्याबाबत दंडाची आकारणीही सुरू करण्यात आली होती. या सर्वच मुद्यांवर वाहतूकदारांनी शासकीय पातळीवर बैठका घेऊन आदेशात स्पष्टता आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने नवे आदेश काढले आहेत.

नव्या आणि सुधारित आदेशानुसार ३१ मार्च २०२० पर्यंतचा कर भरलेल्या वाहनांना पुढील करात ५० टक्के माफी मिळणार आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या करमाफीच्या कालावधीतील कर भरला असल्यास हा कर पुढील सहा महिन्यांसाठी समायोजित होणार आहे. त्याचप्रमाणे मार्च २०२० पर्यंतचा कर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरणाऱ्यांना करमाफीचा पूर्णत: लाभ देण्यात येणार आहे.

सरसकट सहा महिन्यांच्या करमाफीबाबत राज्यातील वाहतूकदारांनी तीन महिन्यांपासून प्रयत्न केले. आंदोलने आणि बैठकाही झाल्या. यापूर्वी करमाफीबाबत काढलेल्या तीन आदेशांमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करून शासनाने नवा आदेश काढला आहे. वार्षिक कर भरणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांना त्याचा लाभ होईल.

– बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल व प्रवासी वाहतूकदार महासंघ